sugar factory
sugar factory

चंदगड : मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत साखर कारखाना बंद करणार

Published on

चंदगड, पुढारी वृत्तसेवा :  एका मोठ्या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून दौलत साखर कारखाना आजपासूनच सोडणार असे अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी कारखाना स्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. पाच वर्षे बंद पडलेला आणि दोन हंगाम घेतलेल्या अथर्व कम्पनीने कारखाना चालवणार नसल्याची भूमिका घेतली असल्याने कामगार, शेतकरी यांच्यात संतापाची लाट उसळली.

सुस्थितीत चालणाऱ्या दौलत साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आज सकाळपासून थकीत पगार आणि ग्रॅच्युएटी मिळावी यासाठी गेटवर आंदोलनाला बसले आहेत. यामुळे जवळपास २-३ तास कारखान्यात जाणारा ऊस अडवण्यात आला. कारखाना मॅनेजमेंट आणि निवृत्त कर्मचारी यांच्यामध्ये चर्चेतून कोणताही मार्ग बाहेर पडला नाही. आज अचानकपणे अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेडचे मानसिंग खोराटे यांनी कारखान्यात येऊन कारखाना बंद करणार असल्याचे जाहीर केले. हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना न्युट्रियंटस कंपनीने चालविण्यासाठी घेतला आहे. परंतु, या कंपनीने करारातील अटी शर्तीप्रमाणे रक्कम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे जमा केली नाही. त्यामुळे २१ डिसेंबर २०१८ ला बँकेने या साखर कारखान्याचा ताबा स्वतःकडे घेतला.

नवीन निविदा काढून कारखाना अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड या कंपनीकडे ३९ वर्षे कालावधीसाठी चालवायला दिला. तेव्हापासून अथर्वचे प्रशासन कारखाना चांगल्या प्रकारे चालवत असल्याचे दिसून येते. पण हा साखर कारखाना बंद पडावा आणि आपल्या हातात यावा यासाठी एक स्थानिक मोठा नेता सतत उपद्रव करत असल्याचे दिसून येते. आज झालेल्या कामगारांच्या आंदोलनामुळे मानसिंग खोराटे कोल्हापूरहून कारखाना स्थळावर हजर झाले, आणि कामगारांसमोर आपली भूमिका मांडली. यावेळी मानसिंग खोराटे म्हणाले की, अनेक अडचणीत असलेला दौलत साखर कारखाना आम्ही चालवायला घेतला आणि आजपर्यंत उत्कृष्टरित्या चालवत आहोत अशी शेतकऱ्यांनी पसंदीही दिली.

एका मोठ्या राजकीय नेत्याला दौलत कारखाना चालू अवस्थेत नको आहे म्हणून आम्ही कारखाना हातात घेतल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्रास देणे चालू ठेवले आहे. ते कोर्टात गेले तेथे कोर्टाने त्यांना हाकलून दिले, कधी एमएसईबी तर कधी पोलिसांना सांगून कारखाना बंद करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. हिम्मत असेलतर समोर येऊन कारस्थाने करा असेही आव्हान खोराटे यांनी यावेळी दिले. आज आम्ही हा कारखाना या राजकीय नेत्याच्या त्रासाला कंटाळून सोडत आहोत. त्यामुळे आजपासून कारखाना बंद करा आणि आपल्याकडे आलेल्या ऊसाच्या गाड्या इतरत्र पाठवा असेही खोराटे यांनी सूचना दिल्या. दरम्यान, अजूनही दौलत प्रशासक आणि निवृत्त कामगारांच्यात चर्चा चालू असल्याचे समजते.

हे ही वाचलं का 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news