किरण मानेंकडून ५ कोटींचा दावा | पुढारी

किरण मानेंकडून ५ कोटींचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून अभिनेता किरण माने यांना अचानकपणे काढून टाकल्यामुळे त्यांनी वकील असीम सरोदे यांच्यासहीत मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गौप्यस्फोट केले . त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्यावर आरोप करून पॅनोरमा आणि इतर संबंधित एजन्सीने माझी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांनी ५ कोटी नुकसान भरपाई द्यावी, अशा आशयाची नोटीस संबंधित कंपन्यांना आणि एजन्सींना पाठवली आहे.”

“पहिल्या दिवसापासून माझा मुद्दा एकच आहे. मला मालिकेतून काढून टाकण्यापूर्वी कोणतंही कारण, तक्रारी याविषयी कोणताही मेल का आला नाही किंवा चॅनेललाही तशी नोटीस व मेल का पाठवला नाही? माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत माझी बाजू का ऐकून घेतली नाही? हिंदीमधील एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून एका मराठी अभिनेत्याला हुकूमशहासारखा आदेश येतो. बेकायदेशीरपणे त्याला काढून टाकलं जातं हे गंभीर आहे, असंविधानिक आहे आणि अन्यायकारक आहे. हे पूर्वापार चालत असेल तर फार भयानक आहे. निदान आता तरी माझ्यानिमित्ताने हे बदलायला हवं. ही माझी इच्छा आहे”, असं मत अभिनेते किरण माने यांनी मांडलं आहे.

“सुरुवातीच्या काळात मला काढून टाकण्यामागे व्यावसायिक कारण असल्याचं प्रोडक्शन हाऊसने सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अत्यंत धक्कादायक आणि नवीन कारण दिलं ते म्हणजे महिलांशी गैरवर्तन. आता महिलांशी गैरवर्तन हे गंभीर स्टेटमेंट आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप धाधांत खोटे, बदनामीकारक आहेत. मला ठरवून, कटकारस्थान रचून सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे”, असा आरोप किरण माने यांनी केला आहे.

किरण माने यांच्या वकिलांनीही त्यांची बाजू सर्वांसमोर मांडली. ते म्हणाले की, “इतकंच नाही तर सामाजिक स्तरावर किरण माने यांचा जो अपमान झाला आहे. त्याप्रकरणी पॅनोरमा आणि त्यांच्याशी संबंधित इतर एजन्सीजला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  किरण माने यांना सामाजिक स्तरावर अपमानित करण्यासोबतच वाळीत टाकण्यात आलं आहे, त्यांची बदनामी झाली आहे आणि स्त्रियांप्रती हा माणूस असंवेदनशील असल्याचं म्हणत त्यांची चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना जो त्रास सहन करावा लागला आहे. करिअरच्या बाबतीत त्यांचं जे नुकसान झालं आहे. त्यासाठी पॅनोरमा आणि इतर संबंधित एजन्सीने त्यांना ५ कोटींची नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आम्ही पाठवलेल्या नोटीशीमध्ये केली आहे.”

Back to top button