कोल्हापूर : वाट पाहीन... पण एसटीने कधी जाईन? | पुढारी

कोल्हापूर : वाट पाहीन... पण एसटीने कधी जाईन?

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू असून तो मिटताना दिसत नाही. सरकारने त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या. संघटनेत फूट पडली; मात्र काही कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. असे असले तरी याबाबत पुढे काय होईल याकडे ना सरकार लक्ष देते ना कर्मचारी. यातून सर्वसामान्यांचे मात्र हाल सुरू असून एसटी पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, याकडे प्रवाशांचे लक्ष आहे.

काही ठिकाणी एसटी कमी-अधिक प्रमाणात धावत असल्या तरी त्यातून त्यांचेच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांना एसटीची सर्वात जास्त गरज असते, असा सामान्य माणूस अजूनही एसटी कर्मचार्‍यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावलेला दिसत नाही. त्यामुळे एसटीचे कर्मचारीच आता सर्वसामान्यांना प्रश्न विचारू लागले असून त्यांनी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे.

एसटी बंद पडल्यानंतर काय होईल याची कल्पनाही सर्वसामान्य प्रवासी करू शकत नाही. एसटी नसेल तर प्रवास सामान्यांच्या आवाक्यात राहणारच नाही. आजचा 500 चा प्रवास एसटी नसेल तेव्हा दोन हजाराचा होईल. एसटीच्या स्टँडवर किमान सावली असते. ऊन, पाऊस यांच्यापासून संरक्षण असते. खासगी गाडीसाठी तुम्ही किती वेळ उघड्यावर थांबणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही.एसटीऐवजी खासगी प्रवासी वाहतुकीचा विचार केल्यास प्रवाशांची लूटच होण्याची शक्यता अधिक दिसते.

ग्रामीण विद्यार्थी शिकण्यात एसटीचे योगदान मोठे आहे. आता कुठे ग्रामीण भागातील शिक्षणाला वेग आला आहे. त्याच्या पाठीमागेही एसटीच आहे. उद्या सवलतीचे पास बंद झाले, तर ग्रामीण भागातील आर्थिक कमकुवत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय, याचे उत्तरही कोण द्यायला तयार नाही. राज्यात अनेक मार्ग तोट्यात असतानाही केवळ प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन एसटी धावली. सध्या तिचा श्वास अडकला असताना त्याकडे राज्यकर्त्यांकडून होणारी डोळेझाक सामान्य प्रवाशाला सहन न होणारी आहे.

Back to top button