कोल्हापूर ; गोकुळमध्ये मनमानी, सत्तेचा दुरुपयोग : शौमिका महाडिक | पुढारी

कोल्हापूर ; गोकुळमध्ये मनमानी, सत्तेचा दुरुपयोग : शौमिका महाडिक

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरजिल्हा दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) मनमानी कारभार आणि सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. अनधिकृतपणे काही निर्णय घेतले गेले आहेत आणि हे निर्णय घेताना सहकाराचे कसलेही नियम पाळले गेले नाहीत. यासंदर्भात गोकुळच्या येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत माहिती मिळेल, अशी अपेक्षा आहे. बैठकीत कार्यवाही न झाल्यास पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे पत्रक गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, गडमुडशिंगी येथील दूध संस्थांबाबत घडलेला प्रकाराबाबत आवाज उठवून लढा देण्याचे धाडस दाखविल्याबद्दल दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन करते. अशा इतरही काही संस्थांवर अन्याय झाल्याची प्रकरणे आता हळूहळू समोर येतील. लोकांचे कष्ट, त्यांचे आशीर्वाद, सभासदांचा विश्‍वास म्हणजे सहकार असतो. याचा विसर कदाचित गोकुळमधील सत्ताधार्‍यांना पडला असावा.

आजकाल संघामध्ये सर्रास मनमानी कारभार आणि सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. गोकुळमध्ये अनधिकृतपणे काही निर्णय घेतले गेले आहेत. सहकाराचे कोणतेही नियम पाळले गेले नाहीत. यासंदर्भात दि. 19 जानेवारीला स्वतः संघात जाऊन सर्व गोष्टींची पडताळणी केली. संबंधित विषयाची माहितीही अधिकार्‍यांकडे मागितली.

तेव्हा चेअरमन यांना विचारल्याशिवाय माहिती देऊ शकत नाही, अशी उत्तरे अधिकार्‍यांकडून मिळाली. तरीही आपण संयम राखत चेअरमन विश्‍वास पाटील यांची भेट घेऊन विचारणा केली. त्यांनी उद्या सकाळपर्यंत माहिती देऊ, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा माहिती मागवली. मात्र सत्ताधारी व प्रशासन यांच्याकडून आजअखेर टाळाटाळ सुरू आहे.

गोकुळ संचालक मंडळाची मंगळवारी (दि. 25) बैठक होत आहे. या बैठकीत उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली नाही तर त्या दिवशी आपण पुढील भूमिका स्पष्ट करू, असा इशाराही महाडिक यांनी दिला आहे.

Back to top button