कोल्हापूर : ऋतुजाच्या पुनर्जन्मासाठी सार्‍यांची धडपड !

File Photo
File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : पूनम देशमुख

ऋतुजा…., चारचौघींप्रमाणे तिनेही सुखी संसाराचे, गोंडस बाळाचे स्वप्न पाहिले आणि ते सुख तिच्या पदरातही पडले; मात्र ते सुख डोळ्यांत साठवून तिने वर्षभरापासून अशी काही झोप घेतली आहे की, तिचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत. तिच्या श्वासासाठी… तिच्या मुलांसाठी…. तिला पुनर्जन्म देण्यासाठी तिचे कुटुंबीय, मित्र, आप्तेष्ट सातत्याने झटत आहेत. यश कधी येईल, माहिती नाही; पण त्यांचा नियतीशी संघर्ष सुरूच आहे.

लग्नानंतर काही महिन्यांत गोड बातमी कळताच सर्व कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. त्यात हा आनंद मुलं जुळी असल्याचे समजताच द्विगुणीत झाला होता. बघता बघता 9 महिने सरले आणि ऋतुजाला प्रसूती वेदना सुरू झाल्या. शहरातील एका खासगी दवाखान्यात तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले. प्रसूतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना पतीच्या हातात हात घालून आपली मुलं घेऊन सुखरूप परतेन, काळजी करू नका, असा विश्वास तिने दिला.

काही वेळातच मुलांच्या रडण्याचा आवाज आला आणि ऑपरेशन थिएटरबाहेर उभ्या असणार्‍या परिवारांच्या सुखाला पारावार उरेना; मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. एक मुलगा अन् एक मुलगी सुखरूप पतीच्या हातात आणून दिली गेली; मात्र प्रसूतीदरम्यान ऋतुजा कोमात गेली.

आईच्या दुधासाठी केविलवाणी रडणारी मुलं आता 'आई…आई…' अशी आर्त हाक तिला मारताहेत. कुटुंबीयही मुलांच्या हाकेने ती एकदा तरी झोपेतून उठेल, या आशेवर आहेत. मात्र अजूनही ती वेळ तिच्या आयुष्यात आलेली नाही. ऋतुजाचे बाबा आपली मुलगी, जावई आणि त्या दोन कोवळ्या मुलांचे हाल पाहून खचले आहेत.

रोज तिच्या जवळ जाऊन 'दीदे…, दीदे… या म्हातार्‍या बापाकडे बघं गं…, माझा आवाज पोहोचतोय का तुझ्यापर्यंत…, काहीतरी बोल, डोळ्यांनी तरी सांग गं मला…' अशी विनवणी करतात. मागील काही दिवसांपासून किंचीत हाता-पायांच्या बोटांची हालचाल, डोळे मिचकावणे यासारख्या सकारात्मक बाबी तिच्याकडून होताहेत.

'जिजा'ची मातृत्वाची हाक !

गाढ झोपेत आणि नजर शून्यात हरवलेल्या ऋतुजाला जिजाने मातृत्वाची हाक दिली आहे. जिजा हे सोशल फाऊंडेशन असून विशेषत : गर्भवतींना उपचारा दरम्यान येणार्‍या अडचणींत ते मदत करते. ऋतुजाच्या प्रकरणातही सिंहाचा वाटा या फाऊंडेशनच्या नेहा देसाई यांनी उचलला आहे. ऋतुजाच्या ढासळलेल्या परिस्थितीवरून खचणार्‍या कुटुंबाला मानसिक आधार देण्यापासून तिच्यावरील उपचारासाठी आर्थिक बाजू सावरण्यापर्यंतची धडपड फाऊंडेशनने केली आहे.

अक्कलकोटहून आल्या पादुका, गोव्यातील चर्चमध्ये विशेष प्रार्थना

सोशल मीडियाच्या माध्यमातून ऋतुजा घराघरांत ओळखीची झाली आहे. पुढ्यात दोन कोवळी मुलं आईच्या एका कटाक्षासाठी तिच्?या मायेसाठी टाहो फोडतानाचे द़ृश्य अनेकांच्या मनाचा ठाव घेते. हेच द़ृश्य अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठापर्यंतही पोहोचले आणि तिच्यासाठी स्वामींच्या चंदनाच्या पादुका खास तिच्यासाठी पाठवून देण्यात आल्या. आजही त्या पादुका तिच्या उशाशी आहेत. इतकेच नाही, तर गोव्यातील चर्चमध्येही तिच्यासाठी विशेष प्रार्थना केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news