सोलापूर : बिगबुल विशाल फटे विरोधात आणखी नऊ गुन्हे | पुढारी

सोलापूर : बिगबुल विशाल फटे विरोधात आणखी नऊ गुन्हे

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूकप्रकरणी बिगबुल विशाल अंबादास फटे प्रकरणाचा तपास सोलापूरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक संजय बोटे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आल्याचे सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी सोलापुरात या विभागाकडे आणखी नऊ गुन्हे दाखल झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे ते म्हणाले.

बार्शी शहर व तालुक्यातील गुंतवणूकदारांना जास्त रकमेचे व्याज देतो म्हणून फटे याने कंपनी स्थापन करून नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्या आधारे त्याने महाराष्ट्र, कर्नाटकात सामाजिक, राजकीय तसेच प्रशासकीय व्यक्‍तींनाही गंडा घातला. त्यानंतर कंपनीचा गाशा गुंडाळून त्याने गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केली होती. त्यानंतर विशाल फटे हा काही दिवसांपासून फरार झाला होता.

दरम्यान, विशाल फटे याने सोमवारी सकाळी स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार 17 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास तो ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात, अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या समोर हजर झाला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी व स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी फटे याची कसून चौकशी केली.

त्यानंतर त्याला अटक करून बार्शी पोलिसांनी मंगळवारी बार्शी कोर्टासमोर हजर केले होते. बार्शीच्या न्यायाधीशांनी त्याला 10 (27 जानेवारीपर्यंत) दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर सुरक्षेचा विचार करीत त्याला पुन्हा सोलापूरला आणण्यात आले.

त्याने केलेल्या फसवणुकीची रक्कम ही कोटीच्या घरात आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास हा आर्थिकविशेष तपास पथकाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तसेच त्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नियुक्‍त करण्यात आले. विशेष तपास पथकाच्या प्रमुख आर्थिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपअधिक्षक संजय बोटे हे आहेत. या पथकामध्ये बार्शी व करमाळ्याचे पोलिस निरीक्षकतसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक बार्शी, करमाळ्याचे सहाय्यक निरीक्षक आहेत.

दरम्यान, आज याप्रकरणी या पथकाकडे आणखी नऊ तक्रारी दाखल झाल्या. त्यामध्ये त्याने 65 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याची व्याप्‍ती आणखी वाढत जाण्याची शक्यता असल्याचे जाधव यांनी सांगितले. याप्रकरणी तक्रारदारांनी पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले.

फसवणुकीचा आकडा 19.50 कोटींवर

या गुन्ह्याचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक संजय बोटे म्हणाले, विशाल फटे याच्याविरोधात बार्शी पोलिस ठाण्यात एकूण 85 गुन्हे दाखल झाले होते. त्यात 18.50 कोटींहून अधिक रकमेच्या फसवणुकीच्या तक्रारी आहेत. आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी नऊ अर्ज प्राप्त झाले असून त्याची रक्‍कम 65 लाख 1 हजार 342 आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्‍कम ही 19 कोटी 48 लाख 18 हजार 342 इतकी झाली आहे.

Back to top button