कोल्हापूर : विषाणूविरोधी औषधांच्या खपात 25 टक्क्यांची वाढ | पुढारी

कोल्हापूर : विषाणूविरोधी औषधांच्या खपात 25 टक्क्यांची वाढ

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

भारतीय औषधांच्या व्यापारपेठेत नुकत्याच संपलेल्या 2021 सालामध्ये विषाणूविरोधी औषधांच्या विक्रीने सर्वाधिक वाढ नोंदविल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिवर्षी सतत अग्रस्थानी असलेल्या मधुमेह व हृदयरोगांवरील औषधांची वाढ यंदा खालच्या स्थानावर आहे.

औषधांच्या खपवाढीच्या स्पर्धेमध्ये 25.5 टक्क्यांची वाढ नोंदविणारी विषाणूविरोधी औषधे पहिल्या स्थानावर आहेत. वेदनाशामक औषधांचा खप (22.6 टक्के) यंदा दुसर्‍या स्थानावर आहे. श्वनससंस्थेशी निगडित आजारावरील औषधांचा खप (20.1 टक्के) तिसर्‍या स्थानावर असून, व्हिटॅमिन्स, मिनरल आणि न्यूट्रिएंटस् 15.8 टक्के खपवाढीच्या आधारावर चौथ्या स्थानावर आहेत, तर हृदयरोग व मधुमेहावरील औषधांच्या खपाने गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 9 टक्के व 6.1 टक्के इतकी वाढ नोंदविली आहे.

देशातील औषध बाजारात विक्री केल्या जाणार्‍या औषधांच्या नोंदी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या (एआयओसीडी) ओवॅक या विभागामार्फत अद्ययावत केली जातात. त्यांचा माहितीचा समग्र डाटा उपलब्ध झाला आहे. यानुसार देशात 2021 सालामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत फॅविपिरावीर व रेमडेसिवीर या दोन विषाणूविरोधी औषधांचा एकत्रित खप 2700 कोटी रुपयांवर आहे. या औषधांनी 2020 सालामधील औषध बाजारात हलचल माजविली होती. त्याच्या तुलनेत वाढ थोडी कमी दिसत असली, तरी या विभागातील 21 टक्क्यांची वाढ ही अचंबित करणारी ठरली आहे.

भारतीय औषधांच्या बाजारपेेठेमध्ये 2021 सालामध्ये एकूण 1 लाख 67 हजार कोटी रुपयांची औषधे विकली गेली. या व्यवसायातील वृद्धीचा दर 14.9 टक्के इतका होता. कोरोनाच्या लाटेने या खपामध्ये वाढ केली असली, तरी 2022 हे वर्ष या व्यवसायात पुन्हा स्थिरता निर्माण करेल आणि 8 ते 10 टक्क्यांच्या वाढीने हे क्षेत्र पुढे सरकेल, असा अंदाज वर्तविण्यात येतो आहे. भारतातील औषध कंपन्यांमध्ये वाढ नोंदविण्यात एमक्यूअर फार्मा अग्रस्थानी आहे, तर 18.7 टक्क्यांची वाढ नोंदविणारा मॅनकाईंड हा समूह दुसर्‍या स्थानावर आहे. डॉ. रेड्डीज लॅब व सनफार्मास्युटिकल अनुक्रमे 18.3 व 15.8 टक्क्यांची वाढ नोंदवत तिसर्‍या व चौथ्या स्थानावर आहेत.

देशात उच्चांकी 2 लाख 82 हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या दोन दिवसांत सौम्य घट नोंदविण्यात आल्यानंतर गेल्या चोवीस तासांत उच्चांकी नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत 2 लाख 82 हजार 970 बाधितांची भर पडली, तर 441 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला. दरम्यान, 1 लाख 88 हजार 157 रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशाचा कोरोनामुक्ती दर 93.88 टक्क्यांपर्यंत घसरला. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी दैनंदिन बाधितांच्या संख्येत 44 हजार 952 ने वाढ झाली.

राज्यात 43 हजार रुग्ण

मुंबई : राज्यात बुधवारी कोरोनाचे 43 हजार 697 नवे रुग्ण आढळले. यातील 6032 रुग्ण मुंबईतील आहेत. दुसरीकडे, राज्यात बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढत आहे. बुधवारी 46 हजार 591 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात सध्या 2 लाख 64 हजार रुग्ण सक्रिय आहेत.

  • वेदनाशामक औषधांच्या खपात 22.6 टक्क्यांची वाढ
  • श्वसन संस्थेशी निगडित विकारांवरील औषधांच्या खपात 20.1 टक्के वाढ
  • मधुमेह व हृदयरोगावरील औषधांच्या विक्रीत अनुक्रमे 9 व 6.1 टक्के वाढ

Back to top button