वैभववाडीः पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने करूळ घाटात संरक्षक भिंत कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. या मार्गावरील संपूर्ण वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे.
गेले दोन तीन दिवस वैभववाडी तालुक्यात जोरदार पावसाची संततधार सुरु आहे. त्याचा सर्वात जास्त फटका करूळ घाट मार्गाला बसला आहे. करूळ घाट मार्गात पायरी घाटानजीक दरीकडील बाजूची संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने साईड पट्टीचा भागही दरीत कोसळला आहे. करूळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेल्या पोलीस व राष्ट्रीय महामार्गचे अधिकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी धाव घेतली.
कोसळलेल्या ठिकाणी बॅरल व फलक लावण्यात आला आहे. तसेच या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट आंबोली घाट मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरहून येणारी वाहने गगनबावडा भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कोसळलेल्या ठिकाणी आणखी घाट मार्ग खचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचलंत का ?