सिंहगडाची वाहतूक कोंडी सुटेना; घाट रस्ता बंद करूनही गर्दी | पुढारी

सिंहगडाची वाहतूक कोंडी सुटेना; घाट रस्ता बंद करूनही गर्दी

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: सिंहगडासह पानशेत, खडकवासला धरण परिसरात रविवारी (दि. 7) सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी धाव घेतली. गडाच्या घाट रस्त्यावर, तसेच खडकवासला धरणाच्या तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना गैरसोय सहन करावी लागली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी खडकवासला चौपाटीच्या मुख्य रस्त्यावर हवेली पोलिस दिवसभर धावपळ करीत होते. सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता.

हवेलीचे सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे, नितीन नम, पोलिस ऋतुजा मोहिते, शीतल ठेंभे, हवालदार बा़भळे, संतोष भापकर आदी पोलिस जवान, होमगार्ड सिंहगडाच्या पायथ्यापासून डोणजे चौक, खडकवासला चौपाटी, नांदेड फाट्यापर्यंत धावपळ करीत होते.
सिंहगड वनविभागाचे वनरक्षक बाबासाहेब जिवडे म्हणाले, की रविवारी सकाळपासून पर्यटकांनी गर्दी केली. त्यामुळे दोन्ही मार्गांने टप्प्या -टप्प्याने पर्यटकांना सोडण्यात आले. गडावरील वाहनतळ फुल झाल्याने वाहतूक काही काळ बंद करावी लागली. घाट रस्ता बंद करूनही गडावर जाण्यासाठी पर्यटक थांबत होते. घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांना सोडण्यात येत होते. त्यामुळे पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागली.

सुदैवाने जीवितहानी टळली
शनिवारी (6) सकाळी घाट रस्त्यावर जगताप माचीजवळ एक मोठे झाड कोसळले. त्या वेळी तेथून जाणारे पर्यटक थोडक्यात वाचले. वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके, वनरक्षक जिवडे व सुरक्षा रक्षक नितीन गोळे आदींनी धावपळ करीत झाड बाजूला काढून रस्ता मोकळा केला.

Back to top button