मंडणगड; पुढारी वृत्तसेवा : सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य प्रलंबित दहा मागण्यांसाठी आज पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला मंडणगड तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वगळता सर्व स्तरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
मंडणगड तालुक्यातील अकरा कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार विजय सुर्यवंशी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भातील घोषणा केल्याशिवाय मागे न हटण्याचा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आला. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने ठोस भूमीका घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पी.एफ.आर.डी.ए. कायदा रद्द करा, कंत्राटी, अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमीत करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या बिनाशर्त करा, चतुर्थश्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या मंजुर करा, कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द करा, आठव्या वेतन आयोग स्थापनेची कार्यवाही सुरु करा अशा दहा मागण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :