लोणी धामणी : शेतात कांदा बीजोत्पादन; कृषी पदवीधर जयेश वाळुंज यांचा अनोखा प्रयोग | पुढारी

लोणी धामणी : शेतात कांदा बीजोत्पादन; कृषी पदवीधर जयेश वाळुंज यांचा अनोखा प्रयोग

लोणी धामणी; पुढारी वृत्तसेवा : मागील दोन वर्षांपासून कांदा बाजार भावात होत असणारी घसरण लक्षात घेऊन उद्योजक जयेश वाळुंज याने आपल्या शेतात कांदा बीजोत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बियाण्याचा प्लॉट आता तयार झाला असून शेतकऱ्यांकडून या बियाण्याला मोठी मागणी आहे. लोणी बाजार समितीमधील दत्तात्रय धुमाळ आणि कांद्याचे व्यापारी महेंद्र वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली जयेश याने 11 गोणी कांदा 15 रुपये किलो दराने खरेदी केला.

त्यानंतर भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लोणीचे संचालक तान्हाजी वाळुंज यांनी जमिनीची मशागत करून बेड तयार केले आणि त्यावर खते टाकून कांदा लागवड केली. ड्रीपद्वारे पाणी दिल्याने खते देणे सोपे झाले. 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी केली. 85 दिवसांचा कांदा बीजोत्पादन प्लॉट तयार झालेला आहे. हा प्लॉट एक महिन्यात काढणीस तयार होईल. काद्यांला बाजारभाव मिळत नसल्याने कांदा बियाण्यांकडे वळल्याचे ज्यांच्या शेतात हा प्रयोग करण्यात आला ते प्रगतशील शेतकरी तान्हाजी वाळुंज यांनी सांगितले.

रोप निर्मितीसाठी 25 हजार रुपये खर्च
कांदे, खते, औषधे, ड्रीप यांचा मिळून 25 हजार रुपये खर्च आला आहे, असे मोरया फर्टिलायझर्स लोणीचे जयेश वाळुंज यांनी सांगितले तर प्रसिद्ध कांदा व्यापारी महेंद्र वाळुंज यांनी 50 ते 60 किलो बियाणे उत्पादन होईल; शिवाय शेतकऱ्याने तयार केलेले कांदा बियाणे असल्याने इतर शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button