
कुडाळ : मुंबई येथे शनिवारी झालेल्या मराठीच्या विजयी मेळाव्या निमित्त तब्बल 18 वर्षांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले. या घटनेचा आनंद कुडाळ येथे शनिवारी सायंकाळी ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून साजरा केला. महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्णाक्षराने लिहीला जावा असा दिवस असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांमधून उमटत होत्या.
‘आवाज कुणाचा मराठी माणसांच्या एकजुटीचा’, ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’,‘ विनायक राऊत तुम आगे बढो, वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक सौ.श्रेया परब, तालुका संघटक बबन बोभाटे, नागेंद्र परब, अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, महिला आघाडी तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी, एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, बाळू पालव, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, शेखर गावडे, नरेंद्र राणे, दीपक गावडे, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, कवठीचे माजी सरपंच रूपेश वाडयेकर, श्यामा परब, राजू पवार, गोट्या चव्हाण, बंड्या कोरगावकर, सोनाली सावंत, विनय गावडे व शिवसैनिक उपस्थित होते.
उपजिल्हाप्रमुख सावंत म्हणाले, भाजपाकडून विविध विषय घेऊन सर्वत्र तंटे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय त्यांनी घेतला. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार करण्यासाठीच त्यांनी पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय आणला होता. कालही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरातचा नारा दिला आहे. अमराठी लोकांचे लाड करून त्यांच्या मतांवर आपली पोळी भाजून घेण्याचे हे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध करून नमवले आहे. त्यामुळे सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करावा लागला आहे. यानिमित्त मुंबईत मराठी माणूस एकत्र आला आहे. आता महाराष्ट्रातही मराठीची ताकद वाढताना दिसेल.
नागेंद्र परब म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्णाक्षराने लिहिला जावा असा हा दिवस आहे. कारण शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वाचा नारा देत मराठी मनांची मूठ बांधली होती. परंतु भाजप किंवा लाचार सेनेच्या लोकांनी त्यावर एकप्रकारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. मराठी मनांवर घाला घालण्याचे काम सुरू होते, त्याला चपराक बसविण्यासाठी आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झालेले आहेत. खर्याअर्थाने ठाकरे हाच महाराष्ट्राचा ब्रॅण्ड आहे.
श्रेया परब म्हणाल्या, आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. गेली वीस वर्षे ज्या दिवसाची आम्हीच नव्हे तर, सर्व शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील मराठा जनता दोघेही ठाकरे बंधू कधी एकत्र येतात याची वाट पाहात होते. या मेळाव्याची नांदी ठेवून शिवसैनिक आणि मनसैनिक आम्हीही सर्वजण एकत्र काम करू.
अतुल बंगे म्हणाले, खरंतर महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनात होते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजेत, आणि तो दिवस आज आला आहे. ते एकत्र नसल्याने गेल्या काही वर्षांपासून जी बांडगुळे फोफावली होती, ती आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने संपणार आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्याने आज शिवसैनिक अतिशय खूष आहेत.