

कुडाळ : कुडाळ बाजारपेठेतील श्री देव मारूती मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. देवस्थान कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा, आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन आणि वारकरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मंदिराजवळ आ.नीलेश राणे यांच्या माध्यमातून भक्तनिवास उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन कुडाळ नगराध्यक्षा सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्री देव मारुती नगर ब्राम्हण देवस्थान समितीच्या वतीने कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेला सोमवारी सायंकाळपासून प्रारंभ झाला. 6 जुलैपर्यंत सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त संगीत भजन स्पर्धा, आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन आणि वारकरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व भजन स्पर्धेत 7 दिवसात एकूण 60 भजन संघ सहभागी झाले आहेत. सोमवारी सकाळी घटस्थापना करण्यात आली. नंतर दिवसभर जय जय रामकृष्ण हरी अखंड नामस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे उद्योजक जितेंद्र सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष मंदार शिरसाट, तुकाराम शिरसाट, अरविंद शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, प्रकाश कुंटे, प्रसाद धडाम, प्रसाद शिरसाट, नंदू म्हाडेश्वर, विवेक पंडीत, अमेय शिरसाट आदींसह देवस्थान कमिटी पदाधिकारी, सदस्य व भाविक उपस्थित होते.