

Vijay Melava Raj Thackeray Speech Key Points
मुंबई : जवळपास 20 वर्षांनी उद्धव आणि मी एकत्र येत आहे. आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही, जे इतर कोणालाही जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चिमटा काढला. इतकंच नव्हे ठाकरे कुटुंबातील मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकले, याकडे लक्ष वेधणाऱ्या भाजप नेत्यांच्याही खास 'ठाकरे शैली'त त्यांनी समाचार घेतला.
राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेकडून शनिवारी वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे मराठी जनांचा विजय मेळावा घेतला. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी लोकांना उद्देशून भाषण केले.
यावेळी राज ठाकरे म्हणाले, "मी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे. तेव्हापासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, एक गोष्ट खरी आहे की, जवळपास २० वर्षानंतर उद्धव आणि मी एकत्र येत आहे. जे बाळासाहेब ठाकरें यांना जमलं नाही, जे राज्यातील इतर कोणत्याचं नेत्याला जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं."
महाराष्ट्राकडे, मराठीकडे कोणी वेडेवाकडे बघायचं नाही. हिंदीचं अचानक कुठुन आलं समजलंच नाही. लहान मुलांवर जबरदस्ती केली जाते. कोणाला विचारायचं नाही. सत्ता आणि बहुमतावर सगळ लादायचं. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात पण, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असा इशारा त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
ठाकरेंची मुले इंग्रजी मीडियममध्ये शिकली, असं सांगितलं जातं. पण, देवेंद्र फडणवीस इंग्रजीमध्ये शिकून मुख्यमंत्री झाले, दादा भुसे इंग्रजीमध्ये शिकून शिक्षणमंत्री झाले. तुमच्यातला कडवटपणा तुम्ही शिक्षण कोठून घेतलं यात नसतो तर, तो आत असावा लागतो. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजीमध्ये शिकले, आता त्यांच्या मराठी प्रेमावर शंका घेणार का? बाळासाहेब इंग्रजीमध्ये शिकले पण मराठीचा अभिमान त्याच्यात कधी तडजोड केली नाही. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले म्हणून काय त्यांच्या हिंदूत्वावर शंका घेऊ का? असा सवाल त्यांनी केला.
आमच्या मराठीकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेने पहायचं नाही. लहान मुलांवर हिंदीची सक्ती लादताय, तज्ज्ञांशी चर्चा करत नाही. तुमच्याकडे सत्ता असेल पण ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्त्यावर
यापुढे त्यांचं राजकारण जातीमध्ये विभागायला सुरू करतील. मराठी म्हणून कधी एकत्र येऊ देणार नाहीत. मीरा भाईंदरला व्यापाराच्या कानाखाली मारली, त्यामध्ये एक गुजराती आणि एक मराठी निघाला, त्यात गुजराती माणसाला मारलं असं दाखवलं. पण, अजूनतर काहीचं केलं नाही. विनाकारण मारामारी करायची गरज नाही पण, जास्त नाटक केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. यापुढे सर्वांनी सावध आणि सतर्क राहा. यापुढे कोणत्या गोष्टी घडतील कल्पना नाही. पण, ही मराठीसाठीची एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं, अशी आशा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले, "बाळासाहेबांसोबत लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत. एक प्रसंग कधीही विसरणार नाही. १९९९ साली शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता येणार नाही, अशी परिस्थीती होती. पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता. त्या वादामध्ये काहीच होईना. एक दिवस मातोश्री बाहेर बसलो होतो. त्यावेळी प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आले आणि बाळासाहेबांना भेटायचं आहे, असं सांगितलं. मी त्यांना विचारलं काय विषय आहे. ते म्हणाले, सुरेश दादा जैन यांना आम्ही दोन्ही बाजूने मुख्यमंत्री करायचं ठरवलं आहे, एवढं सांगायचं आहे. मी वर गेलो आणि रूममध्ये 'ए काका ऊठ' असं म्हणून बाळासाहेबांना उठवलं. त्यांनी विचारलं काय झाले? त्यावर मी प्रकाश जावडेकर यांनी सांगितलेलं तसं सांगतलं. त्यावर ते म्हणाले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही."