

Diksha Bagwe case latest news
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे (वायंगणीवाडी) येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिक्षा तिमाजी बागवे हिच्या खून प्रकरणात कुडाळ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या खून प्रकरणात अटकेत असलेल्या तिच्या मित्राने खूनानंतर लपवून ठेवलेली खूनासाठी वापरलेली दोरी, दिक्षाचे दप्तर, मोबाईल, ओळखपत्र अशा तब्बल १६ वस्तू पोलिसांनी दोन दिवसांच्या शोधमोहीमेदरम्यान हस्तगत केल्या आहेत.
संशयित आरोपी कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस, मांडशेतवाडी) याने एकतर्फी प्रेमातून हा निर्घृण खून केल्याची कबुली दिली आहे. त्याने दिक्षाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह वाडोस येथील निर्जन शेतमांगरात लपवून ठेवला होता. कुडाळ पोलिसांनी त्यास अटक करून सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवस आरोपीला वाडोस येथील श्री देव बाटमकर मंदिर (बाटमाचा चाळा) परिसरात घेऊन जाऊन तपास करण्यात आला. पोलिस, पंच आणि आरोपी या सर्वांच्या उपस्थितीत आरोपीने डॉ.शरद पाटील यांच्या शेतमागराजवळील झुडपाजवळ लपवलेली चिखलाने माखलेली सॅक बाहेर काढली. या सॅकमध्ये आढळून आलेल्या वस्तूंमध्ये:
नायलॉन दोरी (७ फूट १ इंच लांबीची), दिक्षाचे ओळखपत्र, एसटी बसचा पास, मोबाईल सिमकार्ड, पैसे असलेली हँड पर्स, शालेय वस्तू (वही, पुस्तके, पेन्सिल, रबर), छत्री, हातरुमाल, थम्ब रिंग, लोखंडी कात्री, सॅनिटरी पॅड्स यांचा समावेश होता. या सर्व वस्तूंचा पंचनामा करून पोलिसांनी त्या सिलबंद केल्या.
आरोपीने ज्या ठिकाणी दीक्षा ची चैन टाकली होती त्या भागात बॉम्ब शोधक पथक आणि मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने दिक्षाची ६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चैनचा शोध घेतला. मात्र, ती चैन अद्याप सापडलेली नाही. तसेच वाहत्या ओढ्यातून दिक्षाचा मोबाईल मात्र सापडला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
प्रारंभी दिक्षा आणि आरोपी कुणाल यांच्यात मैत्री होती. कुणालने तिला प्रपोज केल्यानंतर दोघांमध्ये काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र, पुढे दिक्षा आपल्या करिअरकडे लक्ष देऊ इच्छित असल्यामुळे तिने हे संबंध थांबवले. काही काळानंतर दिक्षा इतर मित्रासोबत संवाद साधत असल्याचे समजताच कुणाल चिडला आणि त्यातूनच त्याने खून घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
कुडाळ पोलिसांनी आरोपीची मोटरसायकलही ताब्यात घेतली आहे. तसेच कोल्हापूर येथील न्यायवैद्यक विभागाचे पथक लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पुढील तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.