

कुडाळ : कुडाळ तालुक्यात आतापर्यंत सरासरी 2865 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र त्या तुलनेत तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड अथवा पूरस्थिती निर्माण झालेली नाही.
सततच्या पावसामुळे जीवनमान विस्कळीत होत असले तरी पावसाचा मोठा आर्थिक फटका बसलेला नाही. या सततच्या पावसामुळे शेतीला चांगला फायदा होण्याची अपेक्षा शेतकर्यांना आहे.
गेल्या 24 तासांत कुडाळ तालुक्यात 40 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 2 हजार 865 मि मी. पाऊस पडला आहे. यावर्षी पावसाला मे महिन्याच्या मध्यावधीपासूनच सुरुवात झाली आहे.
मे महिन्यात सुमारे 600 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मात्र आपत्कालीन कक्ष एक जून पासून सुरू होत असल्याने ही नोंद तालुक्यातील पावसाच्या एकूण सरासरी समाविष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे मे महिन्यातील पाऊस पकडला तर यावर्षी सुमारे 3 हजार 400 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही सप्टेंबर,ऑक्टोंबर महिना बाकी आहे.
ऑक्टोंबर दरम्यान परतीच्या पावसाचा जोर जास्त असतो त्यामुळे ऑक्टोबर मध्ये ही पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे. या सर्व स्थितीचा विचार केल्यास तालुक्यात यावर्षी पाऊस किमान 5 हजार मिमी. चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
कुडाळ तालुक्यात गेल्या वीस वर्षात 4600 मिलिमीटर हा सर्वात जास्त पाऊस आहे. यावर्षीचा पाऊस हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. कुडाळ तालुक्यात शिवापूर तसेच घोडगे, जांभवडे यासारखे डोंगराळ भाग येतात. या डोंगराळ भागात पाऊस नेहमीच जास्त पडतो. त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद होत असते.
यावर्षी जूनमध्ये तसा कमी पाऊस पडला. जुलैमध्ये सर्वात जास्त म्हणजे 1हजार 307 पाऊस पडला. तर ऑगस्ट मध्ये 988 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये नेहमीप्रमाणे पाऊसजास्त पडला आहे. आता अजून सप्टेंबर व ऑक्टोबर महिना बाकी असल्याने यामध्ये पाऊस किती प्रमाणात पडतो यावर यावर्षी पावसाची सरासरी अवलंबून असणार आहे.
तालुक्यात यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडला तरी तशी मोठ्या प्रमाणात पडझड झालेली नाही. तसेच कुडाळ तालुक्यात चेंदवण, सरंबळ, पावशी या भागांत दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतर व्हावे लागते. मात्र यावर्षी तशी स्थिती आलेली दिसून येत नाही. यावर्षी पाऊस संततधार असून काही वेळ पाऊस पडला की तो काही काळ विश्रांती घेतो. त्यामुळे पूरस्थिती व नुकसानी मोठ्या प्रमाणात झालेली नाही.