

कुडाळ : शेतकर्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक आहे. शासनाने यासाठी प्रत्येक शेतकर्याची नोंदणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून, या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यात महसूल विभागाची यंत्रणा गावा-गावात फिरत आहे.
कुडाळ तालुक्यात सुमारे 84 हजार शेतकरी खातेदार असून, आता पर्यंत केवळ 40 हजार शेतकर्यांनी ही नोंदणी केली आहे. ही संख्या समाधानकारक नसल्याने नोंदणीस गती देण्याच्या सूचना तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिल्या. शासन योजना त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीक विमा योजना, आपत्कालीन नुकसानभरपाई यांसारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर शेतकर्यांना ‘युनिक फार्मर आयडी’ (णपर्र्ळिींश ऋरीाशी खऊ) दिला जाणार असून, त्याद्वारे शेतीविषयक सेवा आणि योजनांमध्ये अधिक सुलभतेने सहभाग घेता येणार आहे.
या कामास गती देण्यासाठी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे आणि तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अधिकार्यांची विशेष बैठक झाली. या बैठकीत सर्व कर्मचार्यांना प्रामाणिकपणे आणि वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.मात्र, काही कर्मचारी अजूनही संथ गतीने काम करत असल्याचे निदर्शनास आले असून, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा आदेश तहसीलदार वसावे यांनी दिला आहे. यासंदर्भात कोणीही हलगर्जीपणा केल्यास कारवाई होणार, असा इशाराही त्यांनी दिला.
कुडाळ तालुक्यातील अनेक खातेदार मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये स्थायिक आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून नोंदणी पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासनाकडून सूचना दिल्या आहेत. सर्व कर्मचार्यांनी समन्वयाने, जबाबदारीने आणि वेळेत हे काम पूर्ण करावे.अॅग्रीस्टॅक नोंदणी 100 टक्के पूर्ण होणे गरजेचे असून, त्यात कोणताही दुर्लक्ष होऊ नये,असे स्पष्ट निर्देश तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिले.