

कुडाळः कुडाळ बसस्थानक येथील महिलेचे दागिने चोरी प्रकरणी तीन महिलांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. या तिन्ही महिला जिल्ह्यातीलच असून त्या रविवारी कुडाळ बस स्थानकात संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळल्या. या महिलांना ताब्यात घेत संशयित म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. सोमवारी कुडाळ न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुकदम यांनी दिली.
कुडाळ बसस्थानकात एका महिलेचे सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरी होण्याची घटना 1 सप्टेंबर रोजी घडली होती. बस स्थानकात पणजी- पुणे एसटी बस मध्ये चढत असताना चोरट्याने पुणे येथील सुलभा मारुती लोंढे या महिलेचे मंगळसूत्र व एक नथ असे सुमारे एक लाख 80 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याची गंभीर दखल घेत बसस्थानकातील संशयास्पद व्यक्तींच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. रविवारी सकाळी काही महिला कुडाळ बसस्थानकात संशयास्पद फिरताना आढळल्या. पोलिसांना या महिलांचा संशय आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलिस स्थानकात आणले. यामध्ये रूपाली पिंटू चौगुले, सपना समशेर चौगुले, दिपाली चौगुले (तिन्ही रा. निपाणी, जि. बेळगाव) यांचा समावेश आहे.
कुडाळ बस स्थानकात 1 सप्टेंबर रोजी घडलेल्या चोरी प्रकरणी संशयित म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. या तिन्ही महिलांवर अशा प्रकारच्या चोरीचे अन्य जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे तपासत निषन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या महिलांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे काही आधार कार्ड तसेच एटीएम कार्ड सापडली आहेत. त्यामुळे बस स्थानकातील चोरीमध्ये या महिलांचा हात असण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने कुडाळ पोलीस त्यांचा कसून तपास करत आहेत. अधिक तपास हवालदार प्रमोद काळसेकर करीत आहेत.