

ओरोस : सिंधुदुर्ग बँकेने यावर्षी व्यवसायात 6 हजार कोटीचा टप्पा पूर्ण केला असून पुढीलवर्षी 7 हजार कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवले आहे. बँकेच्या ठेवींमध्ये 360 कोटीने वाढ झाली असून ही वाढ 12.12 टक्के एवढी आहे. याशिवाय नव उद्योजक तरुणांना रोजगार निर्मितीसाठी 100 कोटींपेक्षा जास्त कर्ज उपलब्ध केले असून ज्येष्ठ ग्राहकांना डोअर बँकिंग सुविधाच्या माध्यमातून 43 हजार पेक्षा जास्त रक्कम उपलब्ध करून दिली आहे. बँकेच्या 1438 सभासदांना 11 टक्के डिव्हीडंट देण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार 5 कोटी 64 लाख 38 हजार रू.एवढी रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग झाली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे झाली. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद विकास संस्थांचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.
प्रारंभी मागील वार्षिक सभेतील ठरावांचे वाचन करण्यात आले. त्यानंतर बैठकीमध्ये सभासदांचे मत जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग बँक ही राज्यात सर्वात प्रथम वार्षिक सभा घेणारी बँक आहे. 1 जुलै हा कृषी दिन व बँकेचा वर्धापन दिन एकाच दिवशी येत असल्याने याच दिवशी वार्षिक सभा आयोजित करण्याचा निर्णय बँक संचालक मंडळाने घेतला होता. बैठकीत सर्व सभासदांनी संचालक मंडळ आणि बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने 6 हजार कोटीचा टप्पा पूर्ण करत 116 कोटीचा निव्वळ नफा मिळवला आहे. बँकेच्या ठेंवींमध्येही 360 कोटी रू. वाढ झाली असून वाढीचे हे प्रमाण 12.12 टक्के एवढे आहे.
जिल्ह्यातील विकास संस्थां संगणकीकृत करणे, सचिवांचे व्यवस्थापन, विकास संस्थांच्या उत्पन्नात वाढ, दूध उत्पादन वाढीसाठी शेतकरी आणि सभासदांना कर्ज, आदी उपक्रम बँकेने प्रभावीपणे राबवले आहेत. जिल्हा बँकेने मागील वर्षात 6 हजार कोटी तर पुढील वर्षाचे 7 हजार कोटीचे उद्दिष्ट निश्चित केले असून विकास संस्था पतसंस्था उद्योजक यांच्या सहकार्यातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.
शेतकर्यांसाठी बियाणे व खते उपलब्ध करून तसेच त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात यश आले असून नवउद्योजकांना प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण व रोजगार निर्मितीचा प्रयत्न करण्यासाठी तरुणांना 100 कोटी पेक्षा जास्त कर्ज वितरण करून नवीन व्यवसाय उभे करण्यासाठी बँकेने हातभार दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा देण्याच्या उपक्रमांतर्गत आता पर्यंत 43 हजार पेक्षा जास्त रक्कम अदा करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या कामकाजाबाबत विश्वास निर्माण झाला आहे. ‘सखी’ योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा आमचा मानस आहे.
सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असूनही जिल्हा बँकेने रत्नागिरी, रायगड पेक्षा अधिक प्रभावी काम करून या बँकांना मागे टाकले आहे. याचे श्रेय सभासद, ठेवीदार व ग्राहक यांना जाते.अशी भावना श्री. दळवी यांनी व्यक्त केली. माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग बँकेने 2008 पासून दरडोई उत्पन्नात वाढ करण्यासाठी व व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन नव उद्योजकांना सहकार्य केले आहे. महिला व युवकांबरोबर विद्यार्थ्यांना रक्कम उपलब्ध करून देण्यास प्रयत्न केले. यासाठी बैठकीत संचालक आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.
विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकर्यांबरोबर मच्छीमारा नाही कर्ज उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय सिंधुदुर्ग बँक घेत आहे. याबरोबरच दुग्ध व्यवसाय महिला व उद्योजकांना आर्थिक पतपुरवठा करून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीच्या दृष्टीने हातभार लावला जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अपेक्षित असे पारदर्शक कामकाज करण्यात येत असल्याचे श्री. दळवी म्हणाले.