Sindhudurg News : रुमाला पायी रेलिंग पलीकडे गेला अन् दरीत कोसळला, कावळेसाद पॉईंटवरील घटना

निसरड्या वाटेवरून त्याचा पाय घसरला आणि क्षणात तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला
Sindhudurg News a man walked over the railing and fell into a valley incident at kavlesad point
Published on
Updated on

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर एक थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर येथील एक तरुण हजारो फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल उचलण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा तोल जाऊन तो दरीत कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आंबोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील काही तरुण पर्यटनासाठी आंबोलीत आले होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ते प्रसिद्ध कावळेसाद पॉईंटवर निसर्गाचा आनंद घेत होते. याचवेळी, दरीत कोसळलेल्या तरुणाचा रुमाल रेलिंगच्या पलीकडे पडला. तो उचलण्यासाठी तरुण रेलिंग ओलांडून पुढे गेला असता, निसरड्या वाटेवरून त्याचा पाय घसरला आणि क्षणात तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिक आणि इतर पर्यटक जमा झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्राथमिक पाहणी करून, सोबत असलेल्या मित्रांची चौकशी सुरू केली आहे. नेमका प्रकार कसा घडला, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून मित्रांचे जबाब नोंदवले जात आहेत.

दरम्यान, दरीत कोसळलेल्या तरुणाला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे, मात्र या मदतकार्यात मोठे अडथळे येत आहेत. घटनास्थळी अत्यंत दाट धुके पसरले असून, काही फुटांवरचेही दिसणे कठीण झाले आहे. यासोबतच, या दुर्गम भागात मोबाईलला रेंज नसल्याने संवाद साधण्यात आणि समन्वय साधण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे बचावकार्याचा वेग मंदावला आहे.

या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घटनास्थळी चिंतेचे आणि तणावपूर्ण वातावरण आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत अशा घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news