

Sindhudurg Politics
ओरोस : ना. भरत गोगावले यांनी खा. नारायण राणेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत जाहीर माफी मागावी, त्याशिवाय यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती बाबत कोणतीही चर्चा होणार नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिला आहे. खा. राणे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून विजयी झालेले मंत्री आणि आमदार यांच्या समोर ना. गोगावले यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत क्लेशदायक आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
श्री. सावंत म्हणाले, भाजपेचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे हे आमचे आदरस्थान आहेत, त्यांच्या बद्दल मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर सभेत वापरलेले शब्द व वक्त्यव्य अत्यंत दुर्दैवी आहे. नारायण राणेंचा राजकीय इतिहास व त्यांच्या कार्यशैलीबद्दल केवळ आमच्या पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील अनेक नेतेही जाहीर कौतुक करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रिपद हे स्वतःच्या कर्तृत्वावर व लोकांच्या विश्वास व प्रेमावर मिळवले आहे.
नारायण राणे हे जनतेने निवडून दिलेले खासदार आहेत. चार दशकांहून अधिक काळ ते राज्य व केंद्राच्या राजकारणात आहेत. महाराष्ट्र सरकार व केंद्रिय मंत्रिमंडळात त्यांनी विविध जबाबदार्या यशस्वी सांभाळसल्या आहेत. अशा ज्येष्ठ नेत्यावर असंवेदनशील व आक्षेपार्ह भाषेत जबाबदार मंत्र्यांने टिप्पणी करणे योग्य नाही. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी व स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भरत गोगावले यांनी अशी वक्त्यव्ये करू नयेत. व महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये.
मंत्री गोगावले यांच्या विधानामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र व संतप्त आहेत. या प्रकरणी अनेकजण व्यक्त होत आहेत. तरी भरत गोगावले यांनी खा. नारायणराव राणे यांची जाहीर माफी मागावी. त्यानंतरच जिल्ह्यातील महायुतीच्या यापुढील चर्चा होतील.महायुतीतील घटक पक्षातील सर्वच नेत्यांनी अत्यंत विचारपूर्वक व संयमाने विधाने करावीत. महायुती यशस्वी करण्याची जबाबदारी एकट्या भाजपची नाही हे ध्यानात घ्यावे.
या सभेत नारायण राणे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकून मंत्री झालेले उदय सामंत, आ. दीपक केसरकर, आ. नीलेश राणे आणि राणे यांनी घडवलेले शेकडो कार्यकर्ते व्यासपीठावर आणि समोर उपस्थित होते. असे असतानाही ना. गोगावले यांनी खा. राणे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरावेत ही क्लेशदायक गोष्ट आहेच, मात्र त्या पेक्षा दुर्दैव म्हणजे, ना. गोगावलेंच्या वक्तव्यावर तेथे उपस्थिती लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी अद्याप व्यक्त झालेले नाहीत. महायुती म्हणून आम्ही ही बाब खटकलेली आहे.