कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या कुडाळ तालुक्यातील सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस बुद्रुक गावचे तलाठी एस. एम. अरखराव यांच्यावर शासकीय रक्कम रुपये 6 लाख 57 हजार 443 सरकार दप्तरी भरणा न केल्याच्या कारणामुळे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या नियम (4) च्या पोट नियम (9) खंड अ च्या तरतुदी नुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या अहवालानंतर कुडाळ उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे महसुलचा महसुल पंधरावडा उपक्रम सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
तलाठी अरखराव यांच्यावर 7 जुलै 2024 रोजी कुडाळ तालुक्यात ओरोस येथे आलेल्या पुरावेळी उपस्थित न राहिल्याने तसेच एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत खातेदारांकडून वसूल केलेली रक्कम रुपये 6 लाख 57 हजार 443 शासकीय खजिन्यात भरना न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच अतिरिक्त कार्यभार असलेल्या सजा वर्दे,डिगस आवळेगाव या गावातील शासकीय रकमेसंदर्भात तलाठी अरखराव यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम 1979. च्या नियम (4) च्या पोट नियम (9) च्या खंड तरतुदीनुसार 6 जुलै 2024 पासून पुढील आदेशापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. या कालावधीत तलाठी एस.एम. अरखराव यांना मालवण मुख्यालय देण्यात आले आहे. दरम्यान तलाठी श्री.अरखराव यांना तहसीलदार यांच्या परवानगीशिवाय मालवण मुख्यालय सोडता येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.