
ओरोस : प्रशासकीय कामकाजात मानवी बुद्धिमत्तेला आता कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. प्रशासकीय कारभारात ‘एआय’ प्रणालीचा अधिकृत वापर करण्याबाबत ‘मार्व्हल कंपनी’ आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार झाला असून, हा गौरव मिळवणारा सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणि प्रशासकीय कामकाजाला नवी गती मिळणार आहे.
शनिवारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करारनामा संपन्न झाला. जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि मार्व्हल कंपनीचे सीईओ यांनी करारावर स्वाक्षर्या केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा उपक्रम राज्य व देशासाठीही मार्गदर्शक ठरणार असून, ही सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानास्पद घटना आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी काढले. या ऐतिहासिक क्षणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कृषी, मत्स्य आणि पोलिस प्रशासन या महत्त्वाच्या विभागांमध्ये सर्वप्रथम ’एआय’ प्रणालीचा वापर करून कार्यक्षमता, वेग आणि पारदर्शकता वाढवली जाणार आहे.
सिंधुदुर्गच्या या मॉडेलचा आदर्श आता इतर जिल्हेही घेत असून, गडचिरोली जिल्हा प्रशासनानेही ’एआय’ वापरास मान्यता दिली आहे. त्यांचे पथक लवकरच सिंधुदुर्गला भेट देणार आहे.
हा प्रकल्प म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नसून, जिल्ह्याच्या संपूर्ण शासकीय प्रक्रियेत एक क्रांतिकारी बदल घडवणारे पाऊल ठरणार आहे. या करारामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आता केवळ पर्यटन किंवा निसर्गरम्यतेसाठीच नव्हे, तर तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठीही ओळखला जाईल. भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले सिंधुदुर्गच्या मातीत रुजवणारा हा प्रकल्प जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमात सिंधुदुर्गच्या ‘एआय’ प्रकल्पाचे कामकाज राज्य मंत्रिमंडळासमोर सादर केले जाणार आहे.