

सावंतवाडी ः सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वास्तू पैकी एक असलेल्या ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृहाच्या दर्शनी भागाच्या उजवीकडील संरक्षक भिंतीचा भाग मुसळधार पावसामुळे शुक्रवारी कोसळला. ही घटना सकाळी 12 वा. घडली. या भिंतीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने जादा नवीन बांधकाम करुन जेलची तटबंदी वाढवली होती, त्यामुळे त्याचा अतिरिक्त भार भिंतीवर पडल्याने ही घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर कैदी सुरक्षित असून कारागृह प्रशासनाने तातडीने भिंत उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या घटनेने जिल्हा प्रशासन हादरले असून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना या घटनेचा अहवाल पाठविण्यात आला आहे. सायंकाळी कारागृहातील 42 कैद्यांना सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात हलविण्यात आले.
गेली दोन दिवस सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पडझडीच्या घटना वाढत असून शुक्रवारी पावसाचा जोर शहरात जास्तच होता. सकाळी 12 वा. ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृहाच्या दर्शनी भागातील उजव्या बाजूची एक साईडची संपूर्ण भिंत अचानक पत्त्यासारखी कोसळली. या घटनेने जिल्हा कारागृहाचे तुरुंग अधिकारी व पोलिस कर्मचारी गोंधळून गेले. अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंतीचा भाग कोसळला असे कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी सांगितले. याबाबत तातडीने गृह विभाग व कारागृह प्रशासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे.
दरम्यान खबरदारी म्हणून या कारागृहातील 42 कैद्यांना सिंधुदुर्गनगरी कारागृहात हलविण्यात आले. या कारागृहाची तटबंदी अलिकडेच अडीच फुटांनी वाढविण्यात आली होती. कारागृहाची संपूर्ण संरक्षक भिंत ही ऐतिहासिक पद्धतीने दगडांनी बांधलेली असून त्याच संरक्षक भिंतींवर हे वाढीव बांधकाम करुन भिंतीची उंची वाढविण्यात आली होती. परंतु जुन्या भिंतींवर नवीन वाढीव भिंतीचा अतिरिक्त भार पडल्याने भिंत जमीनदोस्त झाली. सुमारे 50 फूट लांब व तीस फूट उंचीची ही सरंक्षक भिंत कोसळली आहे.
या कारागृहाची वास्तू ब्रिटीशकालीन आहे. सन 1882 मध्ये या वास्तुचे बांधकाम झाले आहे. त्या काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या कारागृहाची निर्मिती केली होती. कारागृहाच्या जुन्या संरक्षक भिंतीवरच दोन महिन्यांपूर्वीच चारही बाजूंनी अडीच फुटांचे वाढीव बांधकाम केले होते, त्यावेळी या बांधकामाला विरोध झाला होता. सिंधुदुर्गनगरीत जिल्हा कारागृहाची नवीन इमारत उभारण्यात आलेली असताना या जुन्या इमारतीवर नाहक खर्च का? असा सवाल करण्यात आला होता. या जेलचे बांधकाम जुन्या पद्धतीचे आहे. या भिंतींना काही ठिकाणी यापूर्वीच तडे गेले होते, कारागृहाच्या जुन्या भिंतीवर वाढीव बांधकाम करण्यापूर्वी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक होते, मात्र याकडे बांधकाम विभागाने कानाडोळा केला असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. दर्शनी संपूर्ण भिंत कोसळल्याने बाजूंच्या तीन भिंतींना धोका निर्माण झाला आहे. घटनास्थळी तहसीलदार श्रीधर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी भेट देत पाहणी केली. महसूल विभागाच्यावतीने तातडीने याचा पंचनामा करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सरदार पाटील यांनी कारागृहात जाऊन तपास केला. जेलमध्ये 38 पुरुष व चार महिला कैदी आहेत. त्यांना सुरक्षित सिंधुदुर्गनगरी कारागृहात हलविण्यात आले. या घटनेचा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना अहवाल पाठविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने संरक्षक भिंत उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांनी भेट देऊन पहाणी केली.
सावंतवाडी येथील जिल्हा कारागृह ब्रिटीश काळात उभारण्यात आले. या कारागृहाची वास्तू ऐतिहासिक असून इमारत 143 वर्ष जुनी आहे. फक्त दगड,चुना आणि माती यांनी या कारागृहाची तटबंदी बांधण्यात आली आहे.वाढीव तटबंदी उभारत असताना त्या चारही भिंतींची तपासणी करण्यात आली होती, त्यामुळे कुठेही धोका दिसून आला नाही. सर्वात जुने बांधकाम असल्यामुळे अतिवृष्टीमुळे ही घटना घडली.असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.