Flood Situation Sindhudurg | जिल्ह्यात जोर‘धार’; पूरस्थितीने जनता बेजार

Traffic Disruption Rains | वाहतूक विस्कळीत; कुडाळ-आंबेडकरनगरात 10 घरांना पुराचा वेढा
Flood Situation Sindhudurg
काळपनाकानजीक घरांना भंगसाळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा दिला. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

कणकवली : सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत झालेल्या धुवाँधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने भातशेतीत पाणी घुसले. तर अनेक मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी, पर्यायी मार्गाने काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली तर काही ठिकाणची वाहतूक बंद होती.

दरम्यान, कुडाळ-आंबेडकरनगरमध्ये दहा घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्यामुळे या घरातील 35 लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. अणाव-पालववाडी येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच आग विझवल्याने अनर्थ टळला.

गुरुवारी दुपारी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला होता. सिंधुदुर्गात गेल्या 24 तासांत सरासरी 139.87 मि.मि. पावसाची नोंद झाली.

Flood Situation Sindhudurg
Sindhudurg Rain : आठवडाभर पाऊस सुरूच

धुवाँधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीनाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन अनेक मार्ग पाण्याखाली गेले. त्यामध्ये कणकवली-आचरा मार्गावर सेंट उर्सुला स्कूलजवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. याच मार्गावर श्रावण, बेळणे येथे पाणी आल्याने वाहतुकीला फटका बसला होता. आंब्रड-कळसुली मार्गावर बोर्डवे येथे पाणी आल्याने वस्तीची गाडी अडकली होती. मालवण तालुक्यातील असगणी मार्गावर बागायत येथे तर शिवडाव मार्गावर परबवाडी येथे पाणी आले होते. कुडाळ रेल्वेस्टेशन मार्ग पाण्यामुळे बंद होता तर शहरातील गुलमोहर हॉटेलकडे पाणी आल्याने ही वाहतूक राज हॉटेल मार्गे वळविण्यात आली होती.

Flood Situation Sindhudurg
Sindhudurg News | सिंधुदुर्गचे सुपुत्र सुनील नारकर यांची कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

मालवण तालुक्यातील कुडोपी येथे पाणी आल्याने कुडोपी-मालवण मार्ग बंद होता. माणगाव खोर्‍यातील दुकानवाड पुलाजवळ पाणी आल्याने सावंतवाडी-शिवापूर, सावंतवाडी-कुपवडे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे शिवापूर मार्गावरील वाहतूक टाळंबा पर्यंत सुरू होती. सुदैवाने सर्व घाटमार्ग आणि कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू होती. कणकवली तालुक्यातील पियाळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नजीकच्या भातशेतीत पाणी भरले होते.

धुवाँधार पावसामुळे भात लावणीच्या कामात व्यत्यय

सध्या जिल्ह्यात भात लावणीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने भातशेतीचे वाफे जलमय झाले आहेत. त्यामुळे या कामात काहीसा व्यत्यय येत आहे. जोरदार पावसामुळे भरड क्षेत्रावर लावणीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

सर्वाधिक पाऊस हा कणकवली तालुक्यात 220 मि.मि.

सर्वाधिक पाऊस हा कणकवली तालुक्यात 220 मि.मि. तर त्या खालोखाल सावंतवाडी तालुक्यात 180 मि.मि. आणि कुडाळ तालुक्यात 175 मि.मि. झाला. देवगड तालुक्यात 104 मि.मि., वैभववाडीत 120 मि.मि., दोडामार्गात 140 मि.मि., वेंगुर्ले तालुक्यात 115 मि.मि. तर मालवण तालुक्यात 65 मि.मि. पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news