सिंधुदुर्ग : रस्ता भूमिपूजनावरून डिगस येथे शिवसेना ठाकरे गट – भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

सिंधुदुर्ग : रस्ता भूमिपूजनावरून डिगस येथे शिवसेना ठाकरे गट – भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील डिगस येथे आज शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी पणदूर – घोडगे या रस्त्याच्या भूमिपूजनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार्‍या या भूमिपूजनाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. अखेर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी या रस्त्याच्या कामाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन केले.

डिगस येथील पणदूर – घोडगे या रस्त्याच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. रस्त्याचे भूमिपूजन करण्यास आमदार वैभव नाईक यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पक्षीय न होता शासकीय भूमिपूजनाचा कार्यक्रम व्हावा, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली. त्याला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जशास तसे प्रत्युत्तर देत भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्याच हस्ते होईल, अशी भूमिका घेतली. यानंतर आमदार नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले. व त्यांच्यात वाद होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला. मात्र तरीही आमदार नाईक यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे गटाने श्रीफळ वाढवून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. दरम्यान यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news