सिंधुदुर्ग : घरफोडी प्रकरणातील संशयिताकडून कुडाळातील सहा घरफोड्यांची कबुली | पुढारी

सिंधुदुर्ग : घरफोडी प्रकरणातील संशयिताकडून कुडाळातील सहा घरफोड्यांची कबुली

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ शहरातील घरफोडी प्रकरणातील संशयित अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर (रा. कुडाळ पानबाजार) याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची कुडाळ न्यायालयाने वाढ केली आहे. दरम्यान यामध्ये आतापर्यंत 77 हजार रोख रक्कम पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले असून एकूण सोन्याच्या ऐवजापैकी दोन सोन्याच्याचेन त्याने गोल्ड लोन देणार्‍या एका बँकेत ठेवल्याचे उघड झाले आहे. या चेनही पोलिस लवकरच ताब्यात घेणार आहेत. या संशयिताचा कुडाळ शहरातील तब्बल सहा घरफोडी प्रकरणात हात असल्याचे संशयिताने कबूल केले असल्याची पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी दिली.

पडतेवाडी येथील एक्सीस बँकेच्या मागील बाजुस असलेल्या अनंत वैद्य यांच्या बंद बंगल्यातील लंपास ऐवज पैकी दोन सोन्याच्या साखळ्या गोल्ड लोन देणार्‍या बँकेत ठेवल्याचे आरोपी अनंत म्हाडेश्वर याने पोलिसांसमोर गुरुवारी कबूल केले होते. तसेच त्याने चोरलेल्या रोख रकमेपैकी त्यांच्या घरातील व मित्राकडे ठेवलेली अशी मिळून 77 हजार 400 हजार रुपये हस्तगत केले होते. शहरात यापूर्वी झालेल्या चोर्‍या मध्ये अक्षयचा हात आहे का, याचा ही तपास सुरू करण्यात आला आहे. एकूण रक्कमेपैकी सुमारे 10 हजार 600 रुपये आता मिळवणे शिल्लक आहे. दरम्यान, त्याची दोन दिवसांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपताच पोलिसांनी त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले. यावेळी पोलीसांनी यातील उर्वरित रक्कम ताब्यात घेता यावी व संशयिताच्या शहरातील अन्य चोरींमध्ये हात असल्याने पोलिस कोठडी दोन दिवसांची वाढ करून मिळावी अशी मागणी केली होती यानुसार न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

गोल्ड लोन फायनान्स कंपनीही पोलीसांच्या रडारवर.

श्री. म्हाडेश्वर याने चोरीच्या दोन चेन एका बॅ़केत ठेवून त्यावर सुमारे एक लाख रू. रोख घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र संबंधित गोल्ड लोन फायनान्स कंपनीने सोने गहाण ठेवताना गोल्ड लोन नियमानुसार कोणत्याही पावत्यांची तपासणी केली नाही. तसेच संशयिताने यापूर्वीही अशाच प्रकारे चोरीचे दागिने याठिकाणी ठेवले होते. एकच व्यक्ती वारंवार सोने घेऊन येत आहे यावरून संबंधित गोल्ड लोन फायनान्स कंपनीला संशय कसा आला नाही?कंपनीने पोलीसांना याबाबत माहिती दिली असती तर संबंधित संशयित त्वरित पोलीसाच्या हाती लागला असता असे पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी स्पष्ट केले. संबंधित वित्तिय कंपनीच्या व्यवस्थापकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले असल्याचे श्रीम रुणाल मुल्ला यांनी सांगितले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button