भर दुपारी रस्त्यावर युवकाला लुटणारे तिघे जेरबंद | पुढारी

भर दुपारी रस्त्यावर युवकाला लुटणारे तिघे जेरबंद

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर साकेगाव शिवारात एका युवकाला लुटणार्‍या तीन आरोपींना पाथर्डी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गेल्या 16 नोेव्हेंबरला दुपारी भूषण प्रकाश केदार ( ता. नेवासा) यांच्या खिशातील पैसे व मोबाईल तीन तरुणांनी हिसकावून घेतले. पाथर्डी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची सूत्रे हलविली. यातील एका आरोपीचे फुटेज पोलिसांना मिळून आले. त्याचा आधार घेत चेतन उर्फ काल्या संजय घोरपडे (रा. इंदिरानगर, पाथर्डी), सागर अंबादास मर्दाने (रा.दुलेचांदगाव) व मनेश भीमसिंग परदेशी (परदेशी मळा, पाथर्डी) या तिघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.

भूषण केदार हे पाथर्डीहून शेवगावकडे जात असताना, दुपारी तीन वाजता साकेगाव शिवारात मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला लावून लघुशंकेसाठी केदार थांबले होते. यावेळी तेथे तीन अनोळखी व्यक्ती आले व त्यांनी केदार यांना तू आमच्या शेतात लघवी का केली? असे म्हणून शिवीगाळ करून दारू पिण्यासाठी दोन हजार रूपयांची मागणी केली.

त्यांनतर केदार यांना बाजूच्या झाडाकडे ओढत नेले. दमदाटी करून केदार यांच्या खिशातील साडेसात हजार व मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी आरोपी घोरपडे हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्याचा आधार घेत पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर याच्या पथकातील विजय काळोख, विनोद मासळकर यांनी या तिघा आरोपींना अटक केली.आरोपी चेतन उर्फ काल्या घोरपडे हा पाथर्डी-शेवगाव रस्त्यावरील एका तुरीच्या शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तेथे गेले असता, घोरपडे पळू लागला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

 

Back to top button