Gondia News : ऑनलाईन गंडा घालणारी टोळी जेरबंद; ६ जणांना अटक | पुढारी

Gondia News : ऑनलाईन गंडा घालणारी टोळी जेरबंद; ६ जणांना अटक

गोंदिया : पुढारी वृत्तसेवा : क्रेडिट कार्डवर कर्ज मिळवून देण्याच्या नावावर ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीतील 6 जणांना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. सिध्दांत चव्हाण (वय 30, रा. खाडीपार),  प्रवीण पाटील (वय 27, रा. देवरी), कैलाश भोयर (वय 35, रा. चोपा) निखील कुमार कोसले (वय 25), विक्कीसिंग कोसले आणि निलेष सुन्हारे तिन्ही रा. रायपूर अशी आरोपींची नावे आहेत. Gondia News

ऑक्टोबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 या दरम्यान धनराज पुंडलीक सयाम (वय 30, रा.  खाडीपार/ पांढरी) यांच्या ओळखीचे सिध्दांत चव्हाण, प्रवीण पाटील, कैलाश भोयर, निखीलकुमार कोसले, विक्कीसिंग कोसले आणि निलेष सुन्हारे यांनी धनराज सयाम यांना क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देतो, असे सांगितले. धनराज सयाम यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करुन 7 लाख रुपयांचे क्रेडिट कार्डवर लोन मंजूर झाले. त्यांचे क्रेडिट कार्ड व मोबाईल फोन वापरुन त्यांच्या खात्यावर फक्त 2 लाख 37 हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली. उर्वरीत 4 लाख 63 हजार रुपये धनराजच्या संमतीशिवाय इतर ठिकाणी वर्ग करुन 4 लाख 63 हजार रुपयांची तसेच इतरांची देखील फसवणूक केली. याप्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Gondia News

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल व नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी अंमलदारांची पथके तयार करून आरोपींचा शोध घेवून जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी सर्व आरोपींना नागपूर येथून अटक केले असून  आपण इतर अनेकांची देखील फसवणूक केल्याची कबुली आरोपींनी दिली. तपास आर्थिक गुन्हे शाखा, गोंदिया पथक करत आहेत.

पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पावसे, उपनिरीक्षक चावके, हवालदार  विठ्ठल ठाकरे, रंजीत बिसेन, खेमचंद बिसेन, हंसराज भांडारकर, अतूल कोल्हटकर, योगेश रहिले, चालक घनश्याम कुंभलवार यांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा 

Back to top button