सिंधुदुर्ग : ‘गवळदेव’ आचरा गावाची अनोखी परंपरा

सिंधुदुर्ग : ‘गवळदेव’ आचरा गावाची अनोखी परंपरा
Published on
Updated on

आचरा: पुढारी वृत्तसेवा : कोकणात भात कापणी, भुईमूग काढणी झाली की गुराख्यांना वेध लागतात, ते 'गवळदेवा'चे. गावाचा सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणारा व पर्यावरण पूरक जीवनाचे शिक्षण देणारे ही परंपरा आचरा गावात आधुनिक काळात टिकून आहे. ग्रामस्थ व गुराख्यांच्या सहकार्याने होणारे हे स्नेहभोजन म्हणजे कोकणचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे.

जंगलाच्या राजाला साकडं घालण्याचा 'गवळदेव' कार्यक्रम

निसर्ग हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. म्हणूनच कुठलेही काम, व्यवसाय निसर्गपूरक असावे, अशी शिकवण भारतीय संस्कृती देते. म्हणूनच भारतातील सर्व, उत्सव हे पर्यावरण स्नेही आहेत. पाण्यात राहून माशांशी वैर करणे उचित नव्हे. तसेच जंगलात वावरायचं, तर जंगली प्राण्यांशी वैर पत्करून कसं चालेल ? जंगलात चरणारी गाई- गुरे व गुराख्याचे हिंस्त्र पशूपासून संरक्षण व्हावे, यासाठी निसर्ग देवतेला व जंगलाच्या राजाला (वाघाला) साकडं घालण्याचा 'गवळदेवा'चा कार्यक्रम आयोजित केला जातो.

भगवान श्री कृष्णाने ही परंपरा सुरू केल्याची धारणा आहे. आज घरोघरी गुरांची संख्या फार कमी होत असली तरी आचरे गावात ही 'गवळदेव' परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जात आहे. आचरा-देउळवाडी येथील शेतकऱ्यांनी (गुराखी) शनिवारी दुपारी आचरा-नागोचीवाडी येथे जात गवळदेवचा कार्यक्रम संपन्न केला. यात आबालवृद्धापासून सर्वांनीच सहभाग घेतला.

वाडी- वस्ती लगत जंगलात, डोंगराळ भागात नदी किंवा पाणवठयाच्या ठिकाणी हा उत्सव प्रामुख्याने होतो. सर्व गुराखी, शेतकरी, लहान थोर मंडळी गवळदेवाच्या स्थानची साफसफाई करतात. तुळशी वृंदावनाची डागडुजी केली जाते. तेथील देव देवतांची पूजाअर्चा केली जाते. मातीचा  किंवा शेणाचा वाघोबा तयार केला जातो. व त्याची पूजा केली जाते. डाळ, भात, भाजी, खीर, सोलकडी असे जेवण तयार करून देवदेवता, गवळदेव, वाघोबा यांना नेवैद्य दाखविला जातो. त्यानंतर सर्व गुराखी, शेतकरी, लहान मुले एकत्र केळीच्या पानावर किंवा पत्रावळीवर जेवण करून वनभोजनाचा आस्वाद घेतात.

सगळ्या गुराढोरांचे रोगराई व हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी व धनधान्य, दुग्धजन्य उत्पादनाच्या बरकतीसाठी देवाकडे साकडे घातले जाते. तेथील देवतेचा कौल घेतला जातो. प्रतिकात्मक वाघाची पिटाई करून या कार्यक्रमाची सांगता होते. निसर्गाच्या सानिध्यात सहभोजन घेण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला जातो.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news