

मंडणगड : आषाढी एकादशीनिमित्त दिंडीची परंपरा कायम ठेवत याहीवर्षी शहरातील राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलच्यावतीने शनिवारी वारकरी दिंडी काढण्यात आली. लहानग्या वारकर्यांनी विठ्ठल नामाचा, ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात शहर परिसरातून काढलेल्या दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विठू माऊलीच्या जयघोषाने अवघे मंडणगड शहर दुमदुमले.
विठ्ठल-रखुमाई, थोर संतांची वेशभूषा करून लहानग्या वारकर्यांनी विठू माऊलीची पालखी घेऊन विठुनामाचा गजर केला. छोट्या वारकरर्यांच्या या दिंडी सोहळ्याने शहर परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते.
सकाळी 10 वाजता शाळेपासून दिंडीला सुरुवात झाली. शहर परिसर व बस स्थानक दरम्यान दिंडी काढण्यात आली. बस स्थानकात गोल रिंगण घेण्यात आले. यावेळी काही लहानग्या वारकर्यांनी विठ्ठल नामावर आधारित गीत सादर केले, तर मुलींनी लेझिम पथक नृत्य कलेचे सादरीकरण केले. यात नर्सरी, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वारकर्यांचा वेश परिधान केला होता. हा दिंडी सोहळा पाहण्यासाठी बस स्थानक परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरेविषयी माहिती व अनुभव मिळण्यासाठी या दिंडीचे स्कूलच्यावतीने आयोजन करण्यात येते, यामध्ये सर्व जाती, धर्माचे आजी- माजी विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात.
प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र महाजन, मुख्याध्यापक शेडगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका व सांस्कृतिक विभागाने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. संस्थेचे सरचिटणीस एेँड. विनोद दळवी, सरचिटणीस अॅड. अभिजित गांधी, संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन संतोष मांढरे यांनी दिंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.