रत्नागिरी : खेड येथे रेल्वेच्या धडकेत एक कामगार ठार; पाच जखमी | पुढारी

रत्नागिरी : खेड येथे रेल्वेच्या धडकेत एक कामगार ठार; पाच जखमी

खेड; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथील अलसुरे बोगद्यात आज (दि.१५) दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. या बोगद्यामध्ये केबलचे काम सुरू असताना सावंतवाडीहून दिव्याकडे जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर पाच कामगार जखमी झाले. जखमींमध्ये दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असून एक कामगार गंभीर जखमी आहे. तर इतर दोन कामगार किरकोळ जखमी आहेत. या दुर्घटनेच्या सखोल तपासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती गठीत केली आहे.

अधिक माहिती अशी, कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्टेशन आणि अंजनी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान असणाऱ्या अलसुरे बोगद्यामध्ये केबल टाकण्याचे काम सुरू होते. यादरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास रेल्वेची कामगारांना धडक बसली. या दुर्घनेत यशवंत तुकाराम राठोड ( वय ५५ वर्षे, रा. हवेरी तांडा, ता. जिल्हा विजापूर – राज्य कर्नाटक ) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर पाच कामगार जखमी झाले. त्यांनतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये जेमलोआप्पा तिरुपती राठोड (वय ६० वर्षे, रा. गेदलमरी ता. मुद्दे बिहाल जि. विजापूर), अशोक तुकाराम राठोड (वय ५३ वर्षे, रा. हितनळी तांडा, ता. देवर हिप्परगी जि. विजापूर) या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सुनिता रमेश राठोड (वय ४५ वर्षे, रा. हेतनळी तांडा ता. जि. विजापूर) ही महिला गंभीर जखमी असून तिच्यावर कळंबनी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किरकोळ जखमी झालेल्या दोन मजुरांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविले. या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भोयर यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

हेही वाचा :

Back to top button