पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयासमोर तरुणावर धारदार हत्यारांनी वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन सराईतांसह तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद अप्पा ढेरे (वय 22, रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्वर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अन्वर शाकीर शेख ऊर्फ झंब्या, ओंकार दयानंद पवार (दोघे रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्वर आणि ओंकार हे सराईत गुन्हेगार आहेत. दोघांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
दि. 12 एप्रिल रोजी हर्षद दुपारी सव्वाचारच्या सुमारास शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयाच्या गेट नंबर 4 समोर थांबला होता. त्या वेळी अन्वर फिर्यादीजवळ आला. अन्वरने त्याला, 'तुझी जास्त नाटकं झालेली आहेत. माझ्याकडे काय बघतोस.' म्हणून हर्षद ढरे याला हाताने मारहाण केली. नंतर त्याने त्याच्या हातातील गाडीची चावी मागून कानाच्या पाळीत घुसवली. याच वेळी पवार याने सिमेंटचा ब्लॉक हर्षदच्या डोक्यात घातला. त्यानंतर त्याला खाली पाडून, 'थांब, तुझा जीवच घेतो,' म्हणत कोयता काढून त्याच्या डोक्यात घालताना कोयत्याचा फटका हर्षदच्या उजव्या कानावर बसला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. शिवाजीनगर कोर्ट परिसराजवळ ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
हेही वाचा