पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग केंद्राकडून दत्तक!

पर्यटन विकासासाठी सिंधुदुर्ग केंद्राकडून दत्तक!
Published on
Updated on

ओरोस, पुढारी वृत्तसेवा: 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शुभेच्छा संदेश देताना, राज्य शासनाच्या मागणी नुसार केंद्र शासनाने पर्यटन विकसीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतल्याचे सांगितले. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषिपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत सूट देऊन त्यांना वीज बिल कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. 31 मार्चपूर्वी 66 टक्क्यांपर्यंत सवलत घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केले.

पोलिस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, राजेंद्र पराडकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य जणांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमता कायम राखण्यासाठी अनेक शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करलं. त्या सर्व वीरपुत्रांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाही परंपरा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सदैव क्रियाशील रहावे. एकता आणि बंधुता यांचा संदेश देणारी आपली लोकशाही ही जगात सर्वोत्कृष्ट अशीच आहे. अशी ही लोकशाही चिरंतर टिकावी. यासाठीही आपण सजग रहावे.

पर्यटन विकसित करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाच जिल्ह्यांच्या बाबत मागणी केली. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने दत्तक जिल्हा घोषित केला आहे. त्याचबरोबर यवतमाळ हा जिल्हा शिक्षणासाठी घेण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा या पूर्वीच पर्यटन जिल्हा जाहीर झाला आहे. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी निश्‍चितच चांगल्या पायाभूत सुविधा केल्या जातील.

यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय व गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांना पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उपोषणकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

जिल्हाधिकारी, जि. प. कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती, डॉ.जयकृष्ण फड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तर जिल्हा परिषदेत अध्यक्ष संजना सावंत यांच्या हस्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर, सर्व सभापती, विषय समिती प्रमुख व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. जिल्हा न्यायालयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कृषिपंप वीज बिलात 66 टक्के सूट

शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषिपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. या अंतर्गत वीज बिल व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत सूट देऊन वीज बिल कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. 31 मार्च पूर्वी 66 टक्‍कयांपर्यंत सवलत घेऊन वीज बिल कोरे करण्याची शेवटची संधी आहे. या योजनेत कृषिपंप ग्राहकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. वीज बिलाच्या वसूल झालेल्या रकमेतून 33 टक्के ग्रामपंचायत व 33 टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापर करता येणार आहे. कृषिपंप ग्राहकांनी या धोरणाचा लाभ घेऊन वीज बिल कोरे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news