वैभववाडी न.पं. : सहा नगरसेविकांपैकी नगराध्यक्षपदी संधी कुणाला! | पुढारी

वैभववाडी न.पं. : सहा नगरसेविकांपैकी नगराध्यक्षपदी संधी कुणाला!

वैभववाडी, पुढारी वृत्तसेवा: वैभववाडी नगरपंचायतीच्या निकालानंतर सगळ्यांचे लक्ष लागून राहीलेले नगराध्यक्ष आरक्षण मंत्रालयात जाहीर झाले आहे. त्यानुसार नगरपंचायतीवर नगराध्यक्ष म्हणून सर्वसाधारण महिला विराजमान होणार आहे. नगरपंचायतीवर 17 पैकी 10 जागा मिळवत भाजपने बहुमत मिळवले आहे. या 10 नगरसेवकांपैकी 6 महिला नगरसेवक आहेत. त्यामुळे यातून पक्षश्रेष्ठी पहिल्या टर्मसाठी कोणाची वर्णी लावतात याकडे तालुकावासियांना उत्सुकता लागली आहे.

वैभववाडी नगरपंचायतीची ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. भाजप च्या विजयी 10 नगरसेवकांमध्ये 6 महिला नगरसेवक आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी होत असली तरी रस्सीखेच होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, सर्वसाधारण आरक्षण पडले असते तर मोठी रस्सीखेच पहायला मिळाली असती.

सहा नगरसेवकांमधून पक्ष श्रेष्ठी कोणता निकष वापरुन पहिली संधी कोणाला देणार हे महत्वाचे आहे. सहा संभाव्य उमेदवारांकडे पहाता सुप्रिया तांबे वगळता सर्व पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. प्रभाग 1 मधून नेहा ाईणकर या समोरच्या उमेदवाराला एकही मत घेऊ न देता एकतर्फी विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या स्थानिक व उच्च शिक्षित आहेत. मात्र राजकारणात त्या नवख्या आहेत.

तरीही स्थानिक जनाधार विचारात घेता त्यांना संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे. त्यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. संगिता चव्हाण व यामिनी वळवी, रेवा बावधाने या तिनही नगरसेविका उच्चशिक्षित आहेत.तर सुंदरी निकम या राजकारणात सक्रीय आहेत. एकूणच पक्ष श्रेष्ठी नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागते आहे. ( वैभववाडी न.पं. वार्तापत्र )

हेही वाचलंत का? 

Back to top button