आरक्षणानंतरही तिढा कायम : कुडाळचा नव्या नगराध्यक्षा कोण? | पुढारी

आरक्षणानंतरही तिढा कायम : कुडाळचा नव्या नगराध्यक्षा कोण?

कुडाळ, प्रमोद म्हाडगुत: कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला आरक्षीत झाल्याने कुडाळच्या महिला नगराध्यक्ष कोण? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र या न. पं. मध्ये त्रिशंकू परिस्थिती असल्याने नगराध्यक्षपदी कुठल्या पक्षाची महिला विराजमान होणार हे काँग्रेसचे दोन नगरसेवक ठरविणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा पाठिंबा कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कुडाळ नगरपंचायत निर्मितीपासून गेल्या पाच वर्षांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतवर सत्ता होती. सत्ता कायम ठेवण्यासाठी राणेभाजपने मूळ भाजपच्या साथीने शर्थीचे प्रयत्न केले, मात्र प्रभाग 1 कविलकाटे मधुन सखु आकेरकर यांना 303 तर शिवसेनेच्या जयंती जळवी यांना 304 मते पडली. यामध्ये भाजप उमेदवार सौ. सखु आकेरकर अवघ्या एका मताने पराभुत झाल्याने भाजपा कुडाळ नगरपंचायत मध्ये सत्तेपासून बाजुला गेली. दुसरीकडे 7 नगरसेवक विजयी झालेल्या शिवसेनेलाही सत्तेपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही.

याउलट महाविकास आघाडी पासून फारकत घेत स्वबळावर निवडणूक लढलेल्या काँग्रेसने प्रभाग 10 केळबाईवाडी मधुन अक्षता खटावकर व प्रभाग 8 मज्जित मोहल्ला-तुपटवाडी मधुन आफरीन करोल असे दोन गनरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे कुडाळ नगरपंचायतमध्ये काँग्रेस ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आहे. काँग्रेसने सोबत यावे यासाठी भाजपने सुरूवातीपासुनच ‘गळ’टाकला असून दुसरीकडे शिवसेना नेत्यांनीही राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची आठवण करुन देत, आपला राजकीय विरोधक कोण आहे? हे पाहून निर्णय घेण्याचे आवाहन काँग्रेसला केले आहे.

याबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवर चर्चा केली तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संपर्कप्रमुख सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आ. वैभव नाईक यांनीही याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. पण काँग्रेस नेमकी काय भुमिका घेणार? याचे उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. दरम्यान, कुडाळ तालुका काँग्रेसच्या बैठकीत याप्रश्‍नी निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आला आहे.

किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या काँग्रेसने भाजपला साथ दिल्यास भाजपमधील अनुभवी व दुसर्‍यांदा नगरसेवक बनलेल्या हिंदू कॉलनी प्रभागाच्या नगरसेविका सौ. सध्या तेरसे किंवा माजी खा. नीलेश राणे यांचे खंद्दे समर्थक आनंद शिरवलकर व गांधीचौक प्रभागातून विजयी झालेल्या प्राजक्‍ता बांदेकर नगराध्यक्ष होवु शकतात. तर उपनगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांना संधी मिळु शकते. शिवसेनेला सत्तेपासुन दूर ठेवायचे असेल तर राणेभाजप काँग्रेसच्या मागणीनुसार अक्षता खटावकर यांना नगराध्यक्ष पद बहाल करू शकते. पण ही शक्यता कमीच आहे, कारण काँग्रेस भाजपसोबत गेल्यास स्थानिक पातळीवर पुढील निवडणुकांमध्ये काय होईल? तसेच काँग्रेस भाजप सोबत गेल्यास राज्यभर चुकीचा मेसेज जावु शकतो. त्यामुळे वरिष्ठ नेते खास करून संपर्कमंत्री सतेज पाटील काय निर्णय घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

काँग्रेस समोर दुसरा पर्याय आहे तो शिवसेनाला पाठींबा देण्याचा, राज्यात महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काँग्रेसला शिवसेनेसोबत जाणे तस काहीच कठीण नाही शिवसेनेला काँग्रेसने पाठींबा दिल्यास प्रभाग 9 मधून सलग दुसर्‍यांदा विजयी झालेल्या श्रेया गवंडे किंवा प्रभाग 13 मधुन विजयी सई काळप यांना नगराध्यक्ष पद मिळु शकते. तर उपनगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांना मिळु शकेल. पण काँग्रेस नगराध्यक्ष पदावर अडुन राहिल्यास शिवसेना नगराध्यक्ष पद सोडेल का? त्यासाठी कोणत्या वाटाघाटी होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे. एकूणच संपर्कमंत्री सतेज पाटील यांच्या निर्णयानंतरच कुडाळ नगरपंचायतचा नवीन नगराध्यक्ष कोण? याचे उत्तर मिळणार आहे.

काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी

कुडाळ नगरपंचायतीत 2 नगरसेवक विजयी झाल्याने काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे. नगराध्यक्ष निवडी दरम्यान कोणताही धोका निर्माझ होऊ नये, याची खबरदारी घेत काँग्रेसने आपल्या दोन्ही उमेदवारांना अज्ञातस्थळी हलविले आहे. दुसरीकडे शिवसेना व भाजपने आपले स्वतंत्र गट जिल्ह्याधिकार्‍यांकडे नोंद केले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button