ठाणे / नाशिक : विश्वनाथ नवलू/ सतीश डोंगरे
कोकणातील (Konkan ) वैशिष्ट्यपूर्ण फळ पिकांना जीआय मानांकन मिळण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यावर आता नवे संशोधनही सुरू झाले असून पालघर बहाडोलीचे जांभूळ आणि बदलापूरचे जांभूळ हे जीआय मानांकनासाठी प्रतवारीमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. यापूर्वी अलिबागचा पांढरा कांदा, देवगड व रत्नागिरीचा हापूस, श्रीवर्धनची सुपारी ही फळ पिके जीआय मानांकनासाठी प्रस्तावित झाली आहेत.
कोकण कृषी विद्यापीठाचे (Konkan Agricultural University) विस्तार संचालक डॉ. संजय भावे आणि फळ पिकाच्या संशोधनात अग्रभागी असलेले सहयोगी प्राध्यापक डॉ. जितेंद्र कदम यांनी याविषयी माहिती देताना कोकणातील ठरावीक भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी फळ पिके नैसर्गिकरीत्या पाहायला मिळत आहेत. यामध्ये देवगड आणि रत्नागिरीचा हापूस याची चव, गोड, आकार, रंग सर्वच उत्तम आहेत. त्यामुळे मानांकनाच्या स्पर्धेत हा सर्वोत्तम ठरला आहे. त्यापाठोपाठ अलिबागच्या पांढर्या कांद्याची चव वैशिष्ट्यपूर्ण असून गोडवा अधिक आहे. तसेच औषधी गुणधर्मही आहे. आता तिसरे मानांकनासाठी जाणारे फळ जांभूळ आहे.
पालघर तालुक्यातील बहाडोलीचे जांभूळ हे आकाराने मोठे, चवीला उत्तम आणि औषधी गुणधर्म असलेले जांभूळ आहे. अशाच पद्धतीचे जांभूळ ठाणे जिल्ह्यातील बदलापूर भागातही आहे. या दोन्ही जांभळांची प्रतवारी तपासली जात आहे. यावर संशोधनही होत आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जीआय मानांकनासाठी त्याचा प्रवास सुरू होईल, असेही या दोन्ही संशोधकांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कोकणातील जी वैशिष्ट्यपूर्ण फळ पिके आहेत, त्यांचा प्रसार वाढावा म्हणून त्यांची कलमेही कृषी विद्यापीठात तयार होत आहेत. ज्या ज्या भौगोलिक वातावरणात ही फळ पिके अधिक बहरतात तिथे त्यांची लागवड वाढावी आणि अधिक संशोधन व्हावे म्हणून कोकण कृषी विद्यापीठाने पावले टाकली आहेत. जीआय मानांकनामुळे या फळ पिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थानही भक्कम होऊ शकणार आहे.
कोकणच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जांभळाची चर्चा सर्वदूर आहे. म्हणूनच या हंगामात या जांभळाच्या भौगोलिक मानांकनाची परीक्षा होणार आहे. जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास या माध्यमातून विविध संस्था पुढे येऊन जांभळाच्या लागवडवाढीचे प्रयत्न करत आहेत. बहाडोलीच्या जांभळांना मुंबई आणि लगतच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. डिसेंबर महिन्यात जांभळाच्या झाडाला मोहोर आल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळे काढणीसाठी तयार होतात आणि जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत दीड महिना जांभूळ फळांचा हंगाम सुरू राहतो. चांगल्या दर्जाच्या जांभळाला बाजारात सरासरी 300 ते 400 रुपये किलो प्रमाणे भाव मिळतो. जांभळाच्या झाडामुळे शेतकर्यांना वार्षिक 25 ते 30 हजारांचे उत्पन्न मिळते. गेल्या वर्षी मान्सून लांबल्याने जांभळाच्या झाडांना महिनाभराच्या उशिराने मोहोर आला होता. यावर्षीही तीच स्थिती आहे.
ठाणे आणि पालघरच्या आदिवासी पाड्यांमध्ये जांभूळ संवर्धनासाठी पिढ्यान्पिढ्या प्रयत्न होत आहेत. शंभरहून अधिक वर्षे जांभूळ पिकांचे संवर्धन या भागात होत आहे. मुंबई-पुण्यात बदलापूरचे जांभूळ प्रसिद्ध आहे. या भागात 200 हेक्टरवर जांभूळ आहे. तर पालघरच्या बहाडोलीत 500 एकरमध्ये जांभूळ आहे. सिंधुदुर्गात जवळपास 5 हजार हेक्टरमध्ये जांभूळ आहे; तर रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार हेक्टरमध्ये जांभूळ आहे. जांभळाच्या पिकांमधून जवळपास 15 कोटीपर्यंत उलाढाल दर हंगामात होते. आदिवासी कुटुंबासाठी जांभूळ हे वर्षानुवर्षे त्यांच्या जगण्याचे साधन आहे. म्हणूनच त्याला महत्त्वही अधिक आहे. नाशिकमधील आदिवासी पाड्यांतील महिला जांभळे वेचून ती बाजारात विकतात. यातून जांभळाची रेसवेरा वाईन निर्माण केली जात आहे. जांभळातील औषधी गुणधर्म पाहता ही तयार झालेली रेसवेरा वाईनही गुणवर्धकही आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने जांभळाची इकॉनॉमी उंचावत आहे.
कोकणातील सह्याद्री प्रदेशातील जंगलात पिकलेल्या जांभळांपासून रेसवेरा वाईनची निर्मिती केली जाते. याव्यतिरिक्त महाबळेश्वर, विदर्भातील चिखलदरा या भागातील जंगलातून जांभूळ आणले जातात. या भागातील कित्येक शेतकरी आणि आदिवासी बांधवांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकविलेलेच जांभूळ वाईनसाठी वापरले जातात. त्यामुळे या वाईनची टेस्ट आणि रंगाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होते.
द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिकला वाईन कॅपिटलचा बहुमानही द्राक्षांनी मिळवून दिला. आता याच नाशिकला जगातल्या पहिल्या जांभळापासून तयार करण्यात आलेल्या वाईनचा बहुमान मिळाला आहे. रेसवेरा वाईनच्या रूपाने ही जांभळापासूनची वाईन सध्या जगभरात लोकप्रिय होताना दिसत आहे. वास्तविक, जगातील पहिली व्यावसायिक जांभूळ वाईन साकारण्याचा प्रवास 2012 मध्ये महाबळेावरच्या जंगलापासून सुरू झाला. सह्याद्रीच्या जंगलातून जांभळाच्या स्रोतांकडून जगातील सर्वांत सुगंधी, स्वादिष्ट आणि पौष्टिक वाईन बनविण्याची त्यांची इच्छा होती. परंतु विविध आव्हानांमुळे व्यावसायिक अनावरण शक्य होत नव्हते. शोधादरम्यान रेसवेराला जगातील अव्वल वाइन मेकर्स असलेले कॅनडामधील जय आणि डोमिनिकच्या रुपात सापडल्याने 2018 मध्ये वाईन निर्मिती प्रक्रियेस वेग मिळाला.
या वाईन निर्मात्यांनी 2018 आणि 2019 मध्ये जांभळाद्वारे मद्य तयार केले. त्याच्या पौष्टिकतेसाठी प्रयोगशाळेत चाचणीदेखील घेण्यात आली. त्यात चार आवश्यक खनिजे आढळले. तसेच सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि रेझव्हेरट्रॉलसह अॅन्टी ऑक्सिडेंट आढळून आले. यातून वाईनला रेसवेरा असे नाव दिले आहे.
एक अब्ज जांभळाच्या बियांचे मोफत वाटप वायनरीमधील बलून-प्रेस प्रक्रियेदरम्यान हजारो किलो बियाणे जांभळाच्या लगद्यापासून वेगळे केले जातात. या बियांपासून जांभळाची लागवड केली जाऊ शकते. त्यामुळे प्रक्रियेतून निघणारी सर्व बियाणे शेतकर्यांसह सर्वसामान्यांना देशभर नि:शुल्क उपलब्ध करून दिली जात आहेत. देशभरात एक अब्जापेक्षा जास्त जांभळाची बियाणे लागवड व वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
हे ही वाचा :