Crocodiles : चिपळूणच्या रस्त्यावरून मगरींचा संचार; नागरिक भयभीत

Crocodiles : चिपळूणच्या रस्त्यावरून मगरींचा संचार; नागरिक भयभीत
Published on
Updated on

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : चिपळूण शहर परिसरात अनेकदा मगरींचा (Crocodiles) शिवनदी, वाशिष्ठी नदी तसेच नाल्यांमध्ये संचार पाहायला मिळतो. मात्र, आता या मगरी चक्क रात्रीच्यावेळी रस्त्यावरून चालताना पाहायला मिळत आहेत. गोवळकोट रोड येथील चरीजवळ हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आला आहे. रात्रीच्यावेळी मगरींच्या रस्त्यावर सुरू असलेल्या संचारामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीमध्ये मगरींची (Crocodiles)  मोठी संख्या आहे. शहरातील रामतीर्थ तलावात देखील मगरी आहेत. अनेकवेळा पावसाळ्यामध्ये या मगरी शहरातील गटारांमध्ये सुद्धा येतात. मात्र, आता त्या रात्रीच्यावेळी रस्त्यावर संचार करू लागल्या आहेत. गोवळकोट चर येथे असणाऱ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आहेत. शहरातील हा एक 'मगर पॉईंट' झाला आहे. जाणारे येणारे लोक या ठिकाणी थांबून मगरी पाहत असतात. त्यांना खायला घालत असतात.

या ठिकाणी एक फुटापासून आठ फुटांपर्यंत अनेक मगरी आहेत. व मगरीची पिल्लेही आहेत. दोनच दिवसांपूर्वी गोवळकोट रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना याच भागातील दोन मगरी चक्क रस्त्यावरून चालताना दिसल्या. वाहनाच्या उजेडात हा प्रकार निदर्शनास आला. यावेळी संबंधिताने गाडी थांबवून या मगरींचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल होत असून यामुळे गोवळकोट मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे . रात्री – अपरात्री मगरी अशा रस्त्यावर येऊन फिरत असतील, तर रात्री गोवळकोटमध्ये ये-जा करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news