MP Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; म्हणाल्या, “आज मला…” | पुढारी

MP Supriya Sule: सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; म्हणाल्या, "आज मला..."

मुंबई: एखाद्या कुंटूंबात कुरबुऱ्या या होतच असतात. नात्यांमध्ये भांड्याला भांडे लागतेच. सत्ता येते आणि सत्ता जाते उरतात ती फक्त नाती.आजही हेच आपुलकी आणि मायेचं नातं आमचं ठाकरे कुटूंबाशी आहे. त्यामुळे आजच्या घडीला मला बाळासाहेबांची आठवण येत असल्याचे, भावनिक विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सध्याच्या राजकीय प्रसंगांवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री असावा तर उद्धव ठाकरेंसारखा. कारण उद्धव ठाकरे हे मोठ्या भावाप्रमाणे सगळ्यांच्या चुका, रूसवे पोटात घेतात. नाती असतात तेव्हा जबाबदाऱ्याही येतात. त्यामुळे सेना ही कुटुंबासारखी राहिली आणि इथून पुढेही राहिल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

राजकारणात यश, अपयश हे येतच असते. राजकारणात दडपशाही जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे भाजपला काही बैठका घ्यायच्या त्या घेवू दे. जनतेची सेवा करणं हे सरकारचं काम आहे आणि महाविकास आघाडी हे उत्तमपणे करत आहे. ठाकरे कुटूंबाशी माझे भावनिक नाते आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला लहानपणापासूनच प्रेम दिले आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबावरचे प्रेम आजही आहे आणि उद्याही राहील, असे त्या म्हणाल्या.

बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादीवर शिवसेना संपविण्याच्या केलेल्या आरोपावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोष देतात, ते पूर्वी राष्ट्रवादीतच होते. ते पक्ष सोडून गेले; पण आजही आमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची मला जाणीव आहे म्हणूनच मी एकाच ताटात जेवलो असेल तर त्या मीठाला जागते. ही माझी सवय आहे, असे म्हणत त्यांनी बंडखोरांवर टीका केली.

हेही वाचा:

Back to top button