सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात भाजपची मुसंडी, ठाकरे गटाला धक्का!

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यात भाजपची मुसंडी, ठाकरे गटाला धक्का!

कुडाळ (सिंधुदुर्ग), पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली. 54 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक 28 ग्रामपंचायतींवर भाजपाने विजय संपादन केला तर त्यापाठोपाठ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 20 ग्रामपंचायतींवर विजय मिळवत भगवा फडकवला. 5 ग्रामपंचायतींवर गाव विकास पॅनलची सत्ता आली. तर एका ग्रामपंचायतींवर थेट सरपंचपदी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

कुडाळ तालुक्यातील 54 पैकी कडावल आणि मांडकुली या दोन ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध झाल्या होत्या. तर, 6 सरपंच आणि 98 सदस्य बिनविरोध झाले होते. त्यामुळे 48 सरपंच आणि 348 सदस्य पदांसाठी 52 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी कुडाळ हायस्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे शांततेत पार पडली. या निवडणूकीत गावागावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल, भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष पुरस्कृत पॅनल, गावविकास पॅनल आणि अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गावागावात ठिकठिकाणी थेट सरपंच पदासह सदस्यांसाठी चुरशीच्या लढती झाल्या होत्या.

या निवडणुकीत भाजपाने 28, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 20 ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. गावविकास पॅनल 5 ग्रामपंचायतींवर विजयी झाले तर कसाल ग्रामपंचायतींवर थेट सरपंचपदी अपक्ष उमेदवार राजन परब विजयी झाले आहेत. मतमोजणीसाठी सकाळपासून तालुक्यातील व गावागावातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ कुडाळ हायस्कूलच्या मैदानानजिक रस्त्यावर गोळा झाले होते. जसजसा फेरीनिहाय निकाल जाहीर होत होता तसतसा या कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा उत्साह अधिक वाढत होता. आपापल्या पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, महाविकास आघाडीसह भाजपाचे कार्यकर्त्यांनी आपापल्या पॅनलचे उमेदवार विजयी होताच जल्लोष साजरा केला. या मतमोजणी दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

कुडाळ तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आल्याचा दावा जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी करीत शिवसेनेच्या सरपंच व सदस्य पदाच्या विजयी उमेदवारांचे शिवसेना शाखेत अभिनंदन केले. तालुक्यातील सर्व गावांचा सर्वागिण विकास करण्याभर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपा तालुकाध्यक्षांचा दुहेरी पराभव

पणदूर ग्रामपंचायत निवडणूकीत सदस्य पदासाठी रिंगणात उतरलेले विद्यमान सरपंच तथा भाजपाचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष तुकाराम (दादा) साईल यांचा दोन मतांनी पराभव झाला. त्यांना एकूण 124 मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महादेव बापू सावंत यांना 126 मते पडून ते विजयी झाले. तर थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत विद्यमान सरपंच दादा साईल यांच्या पत्नी सौ.मनिषा साईल (मते 348) यांचा गाव पॅनलच्या पल्लवी पणदूरकर (मते 381) यांनी पराभव करीत, सरपंचपदी विजयी झाल्या.विशेष म्हणजे माणगाव,नेरूर देवुळवाडा,पावशी य शिवसेना(ठाकरे गट) तर पिंगुळी,ओरोस या ग्रामपंचायती भाजपकडे गेल्या.

हेही वाचा; 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news