रायगड : अलिबाग ग्रामपंचायत निवडणुकीत ‘शेकाप’ला धक्का; शिंदे गटाचे वर्चस्व | पुढारी

रायगड : अलिबाग ग्रामपंचायत निवडणुकीत 'शेकाप'ला धक्का; शिंदे गटाचे वर्चस्व

रायगड, पुढारी वृत्तसेवा : अलिबाग तालुक्यात ६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकाबरोबरच मतमोजणी देखील शांततेत पार पडली. मतदारांनी दिलेला कौल शेतकरी कामगार पक्षाला धक्का देणारा ठरला. मतदानाचा कौल जाहीर होण्यास सुरुवात झाली आणि थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात सामना बरोबरीत सुटला. सहा ग्रामपंचायतींमध्ये शेकापने थेट सरपंच पदाच्या ३ तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ३ जागांवर विजय संपादन केला. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या नारंगी आणि शिरवली तर काँग्रेसच्या बोरिस गुंजीस या ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेनेने राजकीय डावपेच आखून विजय संपादन केला आहे.

बोरिस, गुंजीस , नारंगी , शिरवली या ग्रामपंचायतमध्ये शेकापने कडवी झुंज दिली. परंतु, थेट सरपंचपदाचे उमेदवार निवडून आणू शकले नाहीत. शेतकरी कामगार पक्षाने आक्षी आणि मुळे या ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवारांचा पराभव केला.
प्रतिष्ठित असलेल्या आक्षी ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या रश्मी रवींद्र पाटील विजयी झाल्या आहेत. रश्मी पाटील यांना ९९१ मते मिळाली. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पूजा महेश गुरव यांचा पराभव केला. त्यांना ८६६ मते मिळाली . ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधून समीर म्हात्रे , नेत्रा पाटील , रश्मी वाळंज , प्रभाग २ मधून आनंद बुरांडे , नमु गडकर , कुंजल पाटील , प्रभाग ३ मधून जाया गडकर , विनायक पाटील आणि नीरजा नाईक हे उमेदवार निवडून आले. अशी ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे ७ तर उद्धव ठाकरे गटाचे २ उमेदवार निवडून आले.

मुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली. यामध्ये थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शेकापच्या सुहानी संतोष पाटील विजयी झाल्या त्यांना ३७८ मते मिळाली . त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रतीक्षा थळे यांचा पराभव केला त्यांना२९८ मते मिळाली . ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधून कमलाकर पाटील , तृप्ती थळे , चेतना पाटील , प्रभाग २ मधून प्रसाद थळे , श्रुती थळे , प्रभाग ३ मधून परेश पाटील , अस्मिता पाटील हे उमेदवार निवडून आले आहेत. मुळे ग्रामपंचायतीमध्ये ४ शेकापचे तर ३ सदस्य शिंदे गटाचे निवडून आले आहेत.

बोरिस गुंजीस ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने बाजी मारली. शिंदे गटाच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार सदिच्छा सुधीर पाटील या विजयी झाल्या आहेत. त्यांना ४९५ मते मिळाली त्यांनी शेकाप काँग्रेस आघाडीच्या अर्चना प्रवीण म्हात्रे यांचा पराभव केला. त्यांना ४११ मते मिळाली. ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधून धवल राऊत , सानिका म्हात्रे , प्रभाग २ मधून बेर्डे रवींद्र , मोहिनी वेंगुर्लेकर , प्रभाग ३ मधून हेमंत पडते आणि रेखा म्हात्रे हे उमेदवार निवडून आले आहेत. बोरिस गुंजीस ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे ६ तर शेकाप काँग्रेस आघाडीचा १ उमेदवार निवडून आला आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या नारंगी ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाने सुरुंग लावला. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराचा विजय झालं तर शेकापच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे उदय म्हात्रे निवडून आले त्यांना ५२४ मते मिळाली त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विनोद पाटील यांचा पराभव केला . त्यांना ३७३ मते मिळाली. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधून राजेंद्र म्हात्रे , अनिता पाटील , गुणवंती पाटील , प्रभाग २ मधून राहुल पाटील , केतन म्हात्रे , प्रभाग ३ मधून अमोल पाटील आणि सानिया धुमाळ हे उमेदवार विजयी झाले आहेत. नारंगी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच शिंदे गटाचा विजयी झालं असलातरी सदस्य पदाच्या निवडणुकीत शेकापचे ४ , शेकाप पुरस्कृत अपक्ष १ आणि शिंदे गट २ असे संख्याबळ असणार आहे.

शिरवली ग्रामपंचायतीमध्ये असणारी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्चस्वाला शिंदे गटाने धक्का दिला आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार प्रनिकेत म्हात्रे विजयी झाले त्यांना ४३३ मते मिळाली. त्यांनी शेकापचे सरपंचपदाची उमेदवार प्रकाश म्हात्रे यांचा पराभव केला. प्रकाश म्हात्रे यांना २६४ मते मिळाली. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधून शुभम म्हात्रे , नीलिमा म्हात्रे , कल्पना माळी , प्रभाग २ मधून संदेश म्हात्रे , ललिता माळी , प्रभाग ३ मधून वैभव माळी आणि प्रीती ठाकूर हे उमेदवार विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे ५ तर शेकापचे २ उमेदवार निवडून आले आहेत.

प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या वैजाळी ग्रामपंचायतीमध्ये शेकापने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामपंच्यात निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाने शेकाप बरोबर युती केली होती. शेकापच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे युती, शिंदे गट आणि काँग्रेस असे उमेदवार होते. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत चार उमेदवार होते. परंतु खरी लढत शेकाप आणि शिंदे गट अशी रंगली होती. शेकापच्या शैला पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली . त्यांना ९२४ मते मिळाली. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रशाली पाटील यांचा पराभव केला. प्रशाली पाटील यांना ७२९ मते मिळाली .काँग्रेसच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार सरोज डाकी यांना ३३३ तर राष्ट्रवादी आणि मनसे युतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार मृणाली पाटील यांना ४१७ मते मिळाली. वैजाळी ग्रामपंचायत सदस्यपदाच्या निवडणुकीत प्रभाग १ मधून विजय गावंड , अरुणा पाटील , स्वामिनी मोकल , प्रभाग २ मधून अविनाश मोकल , सागर पाटील ,सारिका मोकल , प्रभाग ३ मधून अंकुर मोकल , शर्वरी ठाकूर आणि शालिनी मोकल हे उमेदवार विजयी झाले आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे ३ शिंदे गट ४ आणि उद्धव ठाकरे गट २ असे पक्षीय बलाबल असणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button