Sindhudurg Jilha Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मतदानानंतर म्याव म्याव आणि कोंबड्यांच्या आवाजाने परिसर दणाणला | पुढारी

Sindhudurg Jilha Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मतदानानंतर म्याव म्याव आणि कोंबड्यांच्या आवाजाने परिसर दणाणला

कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आज (दि.३०) गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. झालेल्या मतदानामध्ये कणकवलीतील मतदानकेंद्रा बाहेर सकाळपासूनच महाविकास आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. (Sindhudurg Jilha Bank)

दरम्यान सायंकाळी चार वाजता मतदानाची वेळ संपली, यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेरील बूथजवळ फटाके वाजवले त्यानंतर घोषणाबाजी सुरू केली.

Sindhudurg Jilha Bank : जिल्हा पोलीस अधिक्षक घटनास्थळी दाखल

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी सुरू केली. तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर हायवेवर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करत होते. यावेळी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये पोलीस तैनात करण्यात आले.

या वेळी दोन्हीबाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती, यामध्ये मांजर आणि कोंबड्याचे आवाजही काढण्यात येत होते. कणकवलीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी तातडीने कणकवली येथे धाव घेतली.

यादरम्यान बँकेचे अध्यक्ष व या निवडणुकीतील उमेदवार सतीश सावंत मतदान केंद्रातून बाहेर आले, त्यावेळीही पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली तोपर्यंत तेथे बसलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना घोषणाबाजी थांबविण्याचे आवाहन करत वातावरण शांत केले.

Back to top button