नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार? नारायण राणे नागपुरातून थेट कणकवलीत | पुढारी

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार? नारायण राणे नागपुरातून थेट कणकवलीत

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा

कणकवलीतील शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजपचे कणकवलीतील आमदार नितेश राणे यांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचवेळी शिवसेनेचे नेते मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून ‘म्यॉव म्यॉव’ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या आमदारांनी सोमवारी विधिमंडळात आक्रमक पवित्रा घेत नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली आहे.

दरम्यान, नितेश राणे ‘नॉट रिचेबल’ असून, त्यांनी आपल्याला अटक होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नितेश राणे यांचे पिता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा काहीही संबंध नाही, त्यामुळे ते अज्ञातवासात जाण्याचे कोणतेही कारण नाही, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 30 डिसेंबर रोजी मतदान आणि 31डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या पॅनेलचे नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. सतीश सावंत यांनी हा हल्ला नितेश राणे यांनीच घडवून आणला, असा आरोप केला होता. संतोष परब यांनीदेखील आपल्या फिर्यादीत नितेश राणेंचे नाव नमूद केले होते.

दरम्यान, पोलिसांनी पुणे भागात राहणार्‍या पाचजणांना यापूर्वी अटक केली होती. आणखी सहावा आरोपी रविवारी सिंधुदुर्ग पोलिसांनी
दिल्लीत अटक केला आहे. त्याचे नाव सचिन सातपुते आहे, असे सांगितले जाते. सचिन सातपुते हा पुणे भागातील असून तो नितेश राणे
यांच्या स्वाभिमान संघटनेचा कार्यकर्ता आहे, आणि तो भाजपकडून पुण्यामध्ये निवडणुकीत उतरला होता, असे सांगितले जाते.

याप्रकरणी कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीसाठी बोलावले होते. सातपुते याला अटक केल्यानंतर नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली होती.

नितेश राणे रविवारी रात्रीनंतर ‘नॉट रिचेबल’ असल्याचे सांगितले जाते. सोमवारी अधिवेशनाला ते उपस्थित नव्हते. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी हा अर्ज दाखल केला असून मंगळवारी त्यावर सुनावणी होणार आहे. एकीकडे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलरवार असतानाच दुसरीकडे मात्र सोमवारी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी नितेश राणे यांना निलंबित करण्याच्या मागणीने शाब्दिक खडाजंगी झाली. शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली. यापूर्वी देखील नितेश राणे यांनी अपशब्द वापरले होते. त्यावेळी त्यांच्यावर भाजपने कारवाई केली असती तर पुन्हा असे घडले नसते. काळ सोकावतो कामा नये असे म्हणत नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज : आज सुनावणी

सिंधुदुर्गनगरी: पुढारी वृत्तसेवा कणकवली येथे संतोष परब यांच्यावर झालेल्या चाकू हल्लाप्रकरणी भाजप आ. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा न्यायालयात दाखल झाला आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर कणकवली येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक संतोष परब यांच्यावर काही दिवसांपूर्वी चाकू हल्ला झाला होता.

या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आ.नितेश राणे यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांनी कणकवली पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती. या प्रकरणात आ. राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, सोमवारी येथील जिल्हा न्यायालयात आ. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. आ.नितेश राणे यांच्यावतीने अ‍ॅड.संग्राम देसाई यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.मंगळवारी होणार्‍या सुनावणीनंतर न्यायालय काय निर्णय देणार? याकडे केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

नितेश अज्ञातवासात नाहीत; सिंधुदुर्गातच : नारायण राणे

सिंधुदुर्गात झालेल्या राड्याशी नितेश राणेंचा काहीही संबंध नाही. त्यांच्यावरील सर्व आरोप सुडाच्या भावनेतून केले जात आहेत. ते अज्ञातवासात नाहीत, सिंधुदुर्गातच आहेत, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांचा पराभव होईल म्हणून सुडाच्या भावनेतून त्यांच्यावर कारवाईचे कारस्थान सुरू आहे, असा आरोपही राणे यांनी केला. नितेश राणे आमदार आहेत. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही. पण, आमच्यावर सूडभावनेने आरोप केले जात असतील तर कोर्टात जावे लागेल. सरकारला काय करायचे ते करू द्या, असे आव्हान राणे यांनी दिले.

हे ही वाचलं का ?

Back to top button