rohini khadse : एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला

जळगाव; पुढारी ऑनलाईन : मुक्ताईनगर मध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद सुरू असताना खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर ( rohini khadse ) या सूत गिरणी वरून कोथळी गावाकडे जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुक्ताईनगर मध्ये गेल्या दोन-तीन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद सुरु आहे. या वादात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे व विद्यमान शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. हा वाद सुरू असतानाच आज जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर ( rohini khadse ) या स्वर्गीय निखिल खडसे सूतगिरणी येथून कोथळी येथे घरी जात असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीची काच फुटली आहे. रोहिणी खडसे खेवलकर या हल्ल्यातून सुखरुप बचावल्या असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
रोहिणी खडसे खेवलकर यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करुन गाडीची फोडलेली काच
या हल्ल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गांभीर्याने दखल घेतली असून पोलीस अधीक्षकांना उद्या निवेदन देणार आहे.