सिंधुदुर्ग : …अन्यथा पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयाला टाळे ठोकू; ठाकरे गटाचा इशारा | पुढारी

सिंधुदुर्ग : ...अन्यथा पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयाला टाळे ठोकू; ठाकरे गटाचा इशारा

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन 318 कोटी रूपयाचा निधी आला. त्या मंजुर निधींची निविदा प्रक्रिया सुध्दा पार पडली. मात्र, त्यातील कामे संबंधित यंत्रणेच्या वतीने का सुरू करण्यात आली नाहीत? असा सवाल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे उपअभियंता आर. पी. सुतार यांना केला.

यावेळी सुतार यांनी याबाबत आपण अधीक्षक अभियंत्यांशी बोला, अशी विनंती केली. यावेळी आ. वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोबाईलवरून अधीक्षक अभियंता तुषार बुरूड यांच्याशी संवाद साधत येत्या २५ जानेवारीपर्यंत निविदा झालेली कामे सुरू करा, अन्यथा २७ जानेवारीला कुडाळ येथील पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा निर्वाणिचा इशारा दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन जवळपास 318 कोटी रूपयाचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झाला. त्यातील बहुतांशी कामांची निविदा प्रक्रिया झाली. निविदा प्रक्रिया होवून दीड महिन्याचा कालावधी उलटला. तरी अद्याप त्या कामांना कार्यारंभ आदेश दिले जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याची दखल घेवून कणकवली विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत यांनी कुडाळ येथील पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाच्या कार्यालयावर धडक देवून अधिकार्‍यांना जाब विचारण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख संजय पडते,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कार्यालयावर धडक दिली.

यावेळी उपअभियंता आर.पी.सुतार यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे बोट दाखविले. त्यानंतर आ. वैभव नाईक यांनी थेट अधिक्षक अभियंता तुषार बुरूड यांना फोन करत चांगलेच खडेबोल सुनावले. आपल्या विभागाचा हा भोंगळ कारभार असुन रस्ते मंजुर होवून दिड – दीड वर्ष का लागते? समृध्दी महामार्ग झाला, सिलिंग झालं, मेट्रो झाली अशी मोठ मोठी विकासकामे झाली तरी सुध्दा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजुर झालेले पंतप्रधान सडक योजनेची कामे होत नाहीत ही शोकांतिका असल्याची खंत व्यक्त करत ही मंजुर कामे दि. 25 जानेवारी पर्यंत सुरू न झाल्यास २७ जानेवारीला कुडाळ येथील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना कोकण विभागीय सचिव मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरस्सेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक ,तालुका संघटक बबन बोभाटे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू , उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका श्रेया गवंडे, माजी नगरसेवक सचिन काळप आदि उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button