Sindhudurg: तारकर्ली समुद्रात बुडालेली मुलगी बचावली | पुढारी

Sindhudurg: तारकर्ली समुद्रात बुडालेली मुलगी बचावली

मालवण, पुढारी वृत्तसेवा :  मालवण तारकर्ली रांजेश्वरमंदिर नजीक समुद्रात बुडालेल्या नऊ वर्षीय मुलीला आणि तिच्यासमवेत असलेल्या नातेवाईकाला वाचविण्यास स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. यात खोल समुद्रात बुडालेल्या के के वृंदा (वय 9,  रा. बेळगाव) हिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Sindhudurg)

मालवण तारकर्ली रांजेश्वरमंदिर नजीक समुद्रात कर्नाटक बेळगाव येथील पाच ते सहा पर्यटक पोहण्यासाठी पाण्यात उतरले. यावेळी तिघे तरुण व दोन लहान बालकांचा समावेश होता.  के. के. वृंदा ही खोल समुद्रात बुडाली असता तिचा मामा व आई पोहत तिला वाचविण्यासाठी गेले. हे तिघेजण बुडत असल्याचे पाहून तारकर्ली येथील गणपत मोंडकर होमगार्ड रुक्मांनंद लोणे, वैभव सावंत, बाबली चोपडेकर, महेंद्र चोपडेकर व कांचन खराडे हे धावून गेले. बुडत असलेल्या सर्व पर्यटकांना पाण्याबाहेर काढले. तत्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. के. के. वृंदा हिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर तिघांची प्रकृती सुखरूप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत सूरज रेडकर महादेव घागरे होमगार्ड शिल्पा मांजरेकर यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. (Sindhudurg)

Sindhudurg  : गणपत मोंडकर पर्यटकांसाठी बनले देवदूत

मालवण तारकर्ली येथे पर्यटन हंगामात पर्यटक बुडाल्याच्या घटना वारंवार घडतात. पर्यटकांच्या बेशिस्तपणामुळे या घटना घडतात. आजही पर्यटक बुडल्याच्या दोन घटना घडल्या. यावेळी तारकर्ली येथील गणपत मोंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचविले. काही दिवसांपूर्वी पर्यटकांना वाचविल्याबद्दल मालवण पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी तारकर्ली समुद्रकिनारी पोलीस बंदोबस्त असावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गणपत मोंडकर हे बुडणाऱ्या पर्यटकांसाठी देवदूत ठरत आहे.

हेही वाचा 

Back to top button