

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्याच्या परिसरात तसेच वेल्हे तालुक्यातील मढे घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने सायंकाळी सहा नंतर सिंहगड तसेच मढे घाट केळदच्या वनक्षेत्रात प्रतिबंध केला आहे. सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्त्यावरील कोंढणपूर फाटा येथे शनिवारी (दि. 21) मध्यरात्री पूर्ण वाढ झालेला बिबट्या वनविभागाच्या सुरक्षा चौकीतील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला. या वेळी मोटारीतून जाणा-यांनी रस्ता ओलांडणार्या बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील म्हणाले, सोशल मीडियावर प्रसारित झालेला व्हिडिओ खरा आहे. कोंढणपूर फाट्यावरील सुरक्षा चौकीच्या सीसीटीव्ही कॅमे-यातही बिबट्याचे चित्रीकरण झाले. बिबट्याची मादी रस्ता ओलांडून जंगलात जात असल्याचे दिसत आहे. सिंहगडपासून पुढे पानशेतपर्यंतच्या जंगलात सध्या तीन ते चार बिबट्यांचे वास्तव्य असावे.
सायंकाळी सात वाजता गड रिकामा करणार
सिंहगडच्या चोहोबाजूंना जंगल आहे. घाटरस्ता तसेच अतकरवाडी व कल्याण पायीमार्गाने जाणार्या गिर्यारोहक, पर्यटकांची वर्दळ पहाटेपासून रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत असते. बिबट्यासह इतर हिंस्र प्राण्यांचा सिंहगडच्या जंगलात अधिवास आहे. रात्रीच्या सुमारास गिर्यारोहक, पर्यटकांना ये-जा करणे धोक्याचे असल्याने सुरक्षेसाठी वनविभागाने सायंकाळी सात वाजता सिंहगड किल्ला रिकामा करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच गडावर जाता येणार आहे. धोक्याचा इशारा देणारे फलक घाटरस्ता व परिसरात लावण्यात येणार आहेत. मढे घाट परिसरातही बिबट्याचा वावर सुरू आहे. या परिसरात वनसफारी, धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गिर्यारोहक, हौशी पर्यटक येत असतात. त्यामुळे वनविभागाने सुरक्षेसाठी सायंकाळी सहानंतर वनक्षेत्रात जाण्यास प्रतिबंध केला आहे.
मढे घाट परिसरात जंगल आहे. बिबटे व इतर वन्यप्राण्यांचा येथील वनक्षेत्रात अधिवास आहे. त्यामुळे पर्यटक, गिर्यारोहकांना सायंकाळी 6ते सकाळी 6 वाजेपर्यंत वनक्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
– गोविंद लगुंटे,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
वेल्हा वन विभाग
हेही वाचा