

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : कुडाळ तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील नारूर परिसरात गुरूवारी (दि. ५) सायंकाळी ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस कोसळला. या पावसाने नदी, ओहळांना पूर आला. या पुरात नारूर येथील देऊळवाडी ते सरनोबतवाडी रस्त्यावरील ओहळावरील जीर्ण साकव कोसळला. मात्र त्यावेळी रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. हि घटना गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. साकव कोसळून पडल्याने तीन वाड्यांचा संपर्क तुटला आहे.
नारुर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातल्याने पुरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे तेथील ओहोळावरील साकव कोसळला. संपर्क तुटल्याने पूर्ण प्राथमिक शाळा शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच देऊळवाडी सरनोबतवाडी व हरिजन वाडी आणि पूर्ण प्राथमिक शाळा नारुर नंबर एक संपर्क तुटला आहे. नारूर येथे ढगफुटीमुळे महालक्ष्मी मंदिर ते रांगणा गडा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्ते आणि मोऱ्या यांची नुकसान झाले आहे. कोणत्याही प्रकारची जीवितानी झालेली नाही. कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, नारूर उपसरपंच मुकुंद सरनोबत व ग्रामपंचायत सदस्य विजय मयेकर यांनी पुरसानीचा आढावा घेतला. दरम्यान माणगाव खो-यातील दुकानवाड पंचक्रोशी मुसळधार पाऊस कोसळला.