

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : फ्लॅटच्या फसवणूकीच्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी एक लाख रूपयांची लाच स्वीकारताना सावंतवाडी सहायक पोलिस निरीक्षक यांना रायगड लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सागर खंडागळे असे या अधिकारीचे आहे. या प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडी भटवाडी येथील फ्लॅट विकण्यातून निर्माण झालेल्या फसवणूकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी पोलीस ठाण्यात फ्लॅट खरेदी प्रकरणात शहरातील बिल्डर सिद्धांत परब व अमित पास्ते अशा दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र याप्रकरणात परब यांना उच्च न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. पास्ते यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही तरीही या प्रकरणातून पास्ते यांना बाहेर काढू यासाठी सिद्धांत परब यांच्याकडे खडांगळे व पाटील यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भात परब यांच्यासोबत सहाय्यक खंडागळे व पाटील यांची गुप्त जागी चारवेळा बैठक झाली होती.
एकुणच याबाबत परब यांनी ठाणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ठाणे लाच लुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे यांनी कारवाई संदर्भात रायगड लाच लुचपत विभागाला आदेश दिले होते. त्याच्या आदेश व मार्गदर्शनानुसार रायगड लाच लुचपत विभागाचे पोलिस निरिक्षक रणजित गलांडे, सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद जाधव , हवालदार महेश पाटील, कौस्तुभ मगर, विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाटकर यांनी आज सावंतवाडीत येत सापळा रचला होता.
सिद्धांत परब यांनी आज (दि. १२)सायंकाळी खंडागळे व पाटील यांनी मागितलेल्या दीड लाख रुपयांपैकी एक लाख रुपये रक्कम पोलिस ठाण्यात आणून देतो, असे सांगितले. त्यानुसार पाच वाजण्याच्या सुमारास परब हे खंडागळे यांना पोलिस ठाण्यातील त्यांच्या केबीनमध्ये भेटले. त्यानंतर १ लाख रुपयांची रक्कम केबिन बाहेर दरवाज्याच्या बाजुला दिली. याच दरम्यान सापळा रचलेल्या रायगड लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांच्यावर धाड टाकली. यावेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाला खंडागळे यांनी स्वीकारलेली १ लाख रुपयांची रक्कम रंगेहाथ सापडली. त्यानुसार खंडागळे यांना तात्काळ ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देतांना रायगड लाच लुचपतचे पोलीस निरीक्षक गलांडे म्हणाले. तक्रारदार परब यांनी ८ ऑक्टोंबर ला यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार गेले चार दिवस रडारवर होतो. या प्रकरणात उपनिरीक्षक सुरज पाटील यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय पाटील हे एका दौऱ्यात ड्युटीवर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास सावंतवाडीत करुन पुढील तपास सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाकडे सोपविण्यात येणार आहे, असे सांगितले. दरम्यान सायंकाळी सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांच्या पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले होते तर या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील खंडागळे यांना अटक करण्यात आली तर सुरज पाटील यांच्या मागावर पथक पाठवण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो रंगेहाथ पकडणाऱ्या पथकाच्या जाळ्यातून सटकला आहे. मात्र त्याला अटक करण्यात येणार आहे असे रायगड लाचलुचपत विभागाने म्हटले आहे.सावंतवाडी भटवाडी येथील बिल्डर सिध्दांत परब यांनी फ्लॅट विकला. अशोक पवार यांनी रूमवर जाऊन पाहणी केली तर तो सैनिकाला विक्री करण्यात आल्याचे अशोक पवार यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.