

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे (ST employees) आंदोलन सुरू आहे. वारंवार विनंती करून कर्मचारी आपल्या मागण्यांवर आणि आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गाड्या सुरू केल्या. मात्र, अशा कर्मचाऱ्यांचा गाड्या अडवून आंदोलनकांनी उपरोधिकपणे सत्कार केला. त्यामुळे २८ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केलं आहे.
शासनच्या माध्यमातून काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही प्रमाणात वाहतूक सुरू करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. अशातच रत्नागिरी राजापूर मार्गावर ३ गाड्या प्रशासनाने सुरू केल्या. याची खबर मिळताच आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील मारुती मंदीर येथे जाऊन गाडी घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हार घालून उपरोधिक सत्कार केला.
या गांधीगिरीचा ठपका ठेवत शासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील २८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात रत्नागिरीतील १७, राजापूर मधील ९ व लांजामधील ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना हार घालून अपमानित केले आणि रा. प. खात्याच्या कामकाजात अडथळा आणून सदर घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण व्हायरल केले, असा ठपका ठेवत या २८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी (ST employees) प्रचंड संताप व्यक्त केला आहे. शांततेच्या मार्गाने चाललेला संप मोडण्यासाठी केलेल्या या कृतीचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला आहे. एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशान्वये राज्य सरकारने समिती नेमली आहे. तरी देखील ठोस तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. संप मागे घ्या, अन्यथा कारवाई, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
पहा व्हिडीओ : हजारो दिव्यांनी उजळला किल्ले पन्हाळा